फर्ग्युसन रस्त्यावरील एका सोसायटीमध्ये घरकाम करणाऱ्या महिलेच्या सात वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याचा प्रकार शुक्रवारी उघडकीस आला. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी या सोसायटीत काम करणाऱ्याला अटक केली असून न्यायालयाने त्याला १९ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.
मोहंमद हुसेन अली अब्दुल अली अन्सारी (वय ३५, रा. पटरावणा, जि. खुशीनगर, उत्तर प्रदेश) असे अटक केलेल्याचे नाव आहे. या प्रकरणी मुलीच्या आईने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फर्ग्युसन रस्त्यावरील एका सोसायटीत मुलीची आई घरकाम करते. त्याच सोसायटीच्या पार्कीगमध्ये आपल्या सात वर्षांच्या मुलीसोबत राहते. अन्सारीही याच सोसायटीत काम करतो. महिला घरकामासाठी गेली असता आरोपींने पीडित मुलगी आणि तिच्या तीन वर्षांच्या बहिणीला तो काम करत असलेल्या सदनिकेत घेऊन गेला. त्या ठिकाणी तिच्यावर बलात्कार केला. हा प्रकार मुलीच्या आईला समजल्यानंतर तिने दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस निरीक्षक (गुन्हे) सीमा मेहेंदळे अधिक तपास करत आहेत.