दिवसभर पावसाची संततधार

लोणावळा : गेल्या दोन-तीन दिवसांपासून येणार येणार म्हणणाऱ्या मोसमी पावसाचे बुधवारी लोणावळा-खंडाळा परिसरात जोरदार आगमन झाले. दरवर्षी सात जूनला लोणावळ्यात आगमन होणारा मोसमी पाऊस यावर्षी एक दिवस उशिरा म्हणजेच ८ जूनला लोणावळ्यात दाखल झाला. बुधवारी सकाळपासून लोणावळ्यात पावसाला सुरुवात झाली. दिवसभर संततधार सुरूच होती. मावळातील ग्रामीण भागात पावसाच्या आगमनामुळे बळीराजा सुखावला आहे.

गेल्या आठवडय़ात पूर्वमोसमी पावसाने चांगलीच हजेरी लावल्याने मावळात भात पेरणीच्या कामाला वेग आला होता. मात्र त्यानंतर पावसाने उघडीप दिल्याने भात रोपांचे काय होणार या चिंतेत शेतकरी वर्ग असताना मान्सूनच्या पावसाचे झालेले आगमन सर्वांसाठी दिलासादायक ठरले आहे. दुसरीकडे करोनातील निर्बंध व दुकाने बंद असल्याने अनेकांना रेनकोट, छत्र्या व पावसाळी साहित्य खरेदी करता न आल्याने त्यांची तारांबळ उडालेली दिसली. लोणावळा शहरात नांगरगाव वलवण या रस्त्याचे काम मागील वर्षभराहून अधिक काळ लोटला तरी अर्धवट असल्याने या रस्त्यावर जागोजागी पाण्याची तळी साचली आहेत. रस्त्याच्या कडेला पाणी वाहून जाण्याकरिता गटार शिल्लक नसल्याने पाणी रस्त्यावरून वाहत आहे.

लोणावळा नगरपरिषद प्रशासनाने तत्काळ सदर रस्त्याचे काम पूर्ण करण्याच्या सूचना ठेकेदाराला द्याव्यात तसेच रस्त्याच्या कडेला पाणी वाहून जाण्यासाठी गटारांची सोय करावी अशी मागणी नागरिक करत आहेत.