केंद्राने दिलेले ‘पॅकेज’ साखर उत्पादकांसाठी हिताचे

केंद्र सरकारने साखर उद्योगासाठी जाहीर केलेले ‘पॅकेज’ साखर कामगार आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी हिताचे आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुरुवारी केंद्र सरकारचे गुणगान गायले. खनिज तेलाच्या आयातीमुळे केंद्र सरकारला झळा पोहोचत आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने इथेनॉल निर्मितीवर भर दिला असून इथेनॉलच्या धोरणातही बदल केला आहे. त्यामुळे आगामी काळात सर्व साखर कारखान्यांमध्ये इथेनॉल निर्मितीचे प्रकल्प सुरू करावेत, असा सल्लाही पवार यांनी साखर उत्पादकांना दिला.

महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखान्याच्या मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिटय़ूट (व्हीएसआय) येथे आयोजित वार्षिक सर्वसाधारण सभेत पवार बोलत होते. इंधन दरवाढीमुळे आणि खनिज तेलाच्या आयातीमुळे केंद्र सरकारला सध्या झळा पोहोचत आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने इथेनॉल निर्मितीला प्राधान्य दिले आहे. इथेनॉलच्या धोरणातही बदल केला आहे. त्याचाही लाभ साखर कारखानदारांनी घेतला पाहिजे. सध्या काही कारखान्यांमध्ये इथेनॉल निर्मितीचे प्रकल्प सुरू झाले आहेत. भविष्यात सर्व साखर कारखान्यांमध्ये इथेनॉल प्रकल्प सुरू झाले पाहिजेत, जेणे करून खनिज तेल आयात कमी करण्यासाठी हातभार लागेल.

ऊस तोडणी कामगारांबाबत बैठक बोलावणार नाही

ऊस तोडणी कामगारांना द्यायच्या दराबाबत करार करण्यात आला असून तो २०२० पर्यंतचा आहे. करारावर राज्य सरकार, ऊ स तोडणी कामगार संघटनांचे प्रतिनिधी, साखर कारखाना प्रतिनिधी, साखर आयुक्त यांच्या स्वाक्षऱ्या असतात. कराराचा कालावधी पूर्ण होण्यापूर्वीच दरात बदल करावा, अशा मागणीचे निवेदन ऊ सतोडणी कामगारांच्या संघटनेने माझ्याकडे दिले आहे. शासन, कारखान्यांचे प्रतिनिधी आणि संघटनांनी याबाबत निर्णय करावा. याबाबत मी बैठक बोलावणार नाही, असेही पवार यांनी स्पष्ट केले.