औद्योगिक प्रगतीमध्ये महाराष्ट्र हे देशातील अग्रेसर राज्य असून वाढत्या उद्योगजगताला नानाविध प्रकारच्या कुशल मनुष्यबळाची आवश्यकता आहे. औद्योगिक उत्पादन क्षेत्र, हॉटेल इंडस्ट्री, हॉस्पिटल व सेवा क्षेत्रात मोठय़ा प्रमाणात आवश्यक असलेली ही कुशल मनुष्यबळाची गरज पूर्ण करण्यासाठी ‘स्किल डेव्हलपेंट’ ही सर्वव्यापक चळवळ व्हायला हवी, असे मत भारतीय कामगार सेनेचे महाराष्ट्राचे सरचिटणीस डॉ. रघुनाथ कुचिक यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण परिषदेचे (एमएसबीटीई) महाराष्ट्र स्किल डेव्हलपमेंट सेंटर (एमएसडीसी) व महाराष्ट्र स्टेट इन्स्टिटय़ूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अॅण्ड केटरिंग टेक्नॉलॉजीच्या वतीने राज्यातील पहिल्या ‘हॉटेल मॅनेजमेंट अॅण्ड केटरिंग स्किल सेंटर’चे उद्घाटन कुचिक यांच्या हस्ते झाले, त्या वेळी ते बोलत होते. या वेळी यशस्वी ग्रुपच्या २०१५ दिनदर्शिकेचे प्रकाशन भारत फोर्ज लिमिटेडचे उपाध्यक्ष डॉ. एस. व्ही. भावे यांच्या हस्ते झाले. या वेळी महाराष्ट्र स्टेट इन्सिटटय़ूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अॅण्ड केटरिंग टेक्नॉलॉजीच्या प्राचार्या कालिंदी भट यांची प्रमुख उपस्थिती होती.
कुचिक म्हणाले,की शहरी विद्याथ्यार्ंप्रमाणेच ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे सेंटर  यशस्वी जीवनासाठी उत्तम संधी असणार आहे. देशभर वेगाने वाढणाऱ्या हॉटेल उद्योगाला आवश्यक असलेले कुशल मनुष्यबळ या सेंटरद्वारे उपलब्ध होणार असून राज्यातील युवक-युवतींनी याचा लाभ घ्यावा.