‘मुख्यमंत्री ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानां’तर्गत मॉडर्न महाविद्यालयाच्या शुभम सातकर याची ग्राम विकास प्रतिनिधी म्हणून निवड करण्यात आली असून या अभियानाचा भाग म्हणून जानेवारीपासून शुभम पुणे जिल्ह्य़ातील जुन्नर आणि शिरूर तालुक्यातील गावांमध्ये काम करत आहे.

शुभम प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या मॉडर्न कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागाचा विद्यार्थी आहे. मावळ तालुक्यातील कान्हे हे त्याचे मूळ गाव. मुख्यमंत्री ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाचा भाग म्हणून ग्राम विकास प्रतिनिधी पाठय़वृत्तीसाठी घेण्यात आलेल्या परीक्षेला राज्यभरातील सुमारे तीस हजार उमेदवार प्रविष्ट झाले. कोणत्याही शाखेची पदवी आणि स्वयंसेवी संस्थेतील कामाचा अनुभव या शिदोरीवर ३० हजार जणांपैकी ६४ युवा उमेदवारांची ग्राम विकास प्रतिनिधी म्हणून निवड करण्यात आली. या अभियानाचा भाग म्हणून शुभम सध्या जुन्नर तालुक्यातील काळवाडी, वडगाव कांदळी, बोरी आणि पारगाव तसेच शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी या गावांचा ग्राम विकास प्रतिनिधी म्हणून काम पहात आहे. शुभम म्हणाला, मॉडर्न महाविद्यालयात राज्यशास्त्राचे शिक्षण घेतानाच माझे गाव असलेल्या मावळ तालुक्यातील कान्हे येथे मावळ प्रबोधिनी या स्वयंसेवी संस्थेशी मी संलग्न होतो. तेथील कामाच्या अनुभवाचा मला या पाठय़वृत्तीसाठी उपयोग झाला, तसेच या पाठय़वृत्तीसाठी निवड झाल्यानंतर महाविद्यालयाचेही सहकार्य मिळाले. त्यामुळे मला हे काम करणे शक्य झाले. स्वयंसेवी संस्थेसाठी काम करण्याचा आवडीचा अनुभव आणि सोबतच मिळणारी पाठय़वृत्ती (स्टायपेंड) यामुळे मी आर्थिकदृष्टय़ा स्वावलंबी झालो आहे.

ग्रामीण भागात जाऊन काम करण्यास सुरुवात केली तेव्हा प्रारंभी ग्रामस्थांचा दृष्टिकोन फारसा स्वागत करणारा नव्हता. मात्र अधूनमधून गावात जाण्याची पद्धत न ठेवता, मी तेथे कायमस्वरुपी वास्तव्य करण्यास सुरुवात केली. नियमित संपर्क ठेवण्याबरोबरच बांधावरच्या बैठका, महिलांच्या ग्रामसभा असे कार्यक्रम घेतले आणि ग्रामस्थांनी मला स्वीकारले. सुरुवातीला मी नियमितपणे खानावळीत जेवत असे. आता ग्रामस्थ मला आपल्याबरोबर जेवायला बसवितात. त्यांची ही कृतीच मला त्यांनी स्वीकारले याचे निदर्शक ठरली आहे, असाही अनुभव शुभमने सांगितला.

शुभमचे शिक्षण अद्याप पूर्ण झालेले नाही. मात्र, ग्रामीण भागात लोकांच्या भेटीगाठी किंवा कोणतीही योजना त्यांच्यापर्यंत पोहोचविणे असे बरेचसे काम हे ग्रामस्थ शेतावर जाण्यापूर्वी आणि शेतावरुन आल्यानंतर करावे लागते. त्यामुळे दिवसभर अभ्यासाला वेळ देणे सहज शक्य होते, असे शुभम याने सांगितले. म्हणूनच ग्रामीण भागात काम करुन प्रत्यक्ष ‘फील्ड वर्क’चा अनुभव घ्यायची इच्छा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी  शुभमचे उदाहरण आदर्श आहे.

अभियानाचे उद्दिष्ट

ग्रामीण भागात केवळ भौतिक सुविधा उपलब्ध करुन देण्याऐवजी तेथील राहणीमानाचा दर्जा उंचावणे, ग्रामस्थांच्या आर्थिक विकासाला हातभार लावणे, गावातील तरुणांसाठी कौशल्य विकासाचे कार्यक्रम राबविणे आणि ग्रामीण भागांतून शहरी भागाकडे होणारे स्थलांतर थांबवणे हे या अभियानाचे मूळ उद्दिष्ट असल्याचे शुभम सातकर याने स्पष्ट केले. शेतावर जाणाऱ्या रस्त्यांचा प्रश्न सोडवणे आणि गावाची संपूर्ण मोजणी करुन जमिनीच्या समस्यांवर उपाय शोधणे हे तीन वर्षांच्या कामातील आपले लक्ष्य असल्याचेही शुभम याने सांगितले.