श्रीमंत थोरले बाजीराव यांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या पाठीमागच्या बाजूचे निखळलेले शिल्प.. अश्वाच्या खालची निखळलेली फरशी.. अश्वाच्या पायाजवळ उगवलेली गवताची पाती.. शिल्पकाराच्या नावातील गायब झालेली काही अक्षरे..
..शनिवारवाडा प्रांगणामध्ये असलेल्या श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या अश्वारूढ पुतळ्यास तीन दशके पूर्ण होत असताना ही दुरवस्था ठळकपणे दिसते. अवघ्या ३९ वर्षांच्या आयुष्यात ४० लढायांमध्ये अपराजित राहण्याचा पराक्रम, पुण्यातून कारभार करीत बडोदा, हैदराबाद, चित्रदुर्ग ते दिल्लीपर्यंत मराठेशाहीचा विस्तार करणारे, रणधुरंदर सेनापती म्हणून इतिहासात कोरले गेलेले नाव.. अशी या सेनापतीची खासीयत. त्यांचा अश्वारूढ पुतळा शनिवारवाडा प्रांगणात उभारला, त्याला मंगळवारी (४ फेब्रुवारी) ३० वर्षे पूर्ण होत आहेत. या पूर्णाकृती पुतळ्याचे ४ फेब्रुवारी १९८३ रोजी भारताचे लष्करप्रमुख अरुणकुमार वैद्य यांच्या हस्ते अनावरण झाले. आबासाहेब गरवारे ट्रस्ट आणि थोरले बाजीराव स्मारक समिती यांच्यातर्फे शिल्पकार बी. आर. खेडकर यांनी घडविलेला हा पुतळा महापालिकेला देण्यात आला आहे. पेशव्यांचा राज्यकारभार चालणाऱ्या शनिवारवाडा या वास्तूच्या दिल्ली दरवाज्यासमोरील प्रांगणात हा पुतळा उभारण्यात आला आहे. या पुतळा परिसरात थोरले बाजीरावाविषयी सर्व माहिती कोरण्यात आली आहे. येथे त्यांच्या हस्ताक्षराचा नमुनाही पाहावयास मिळतो.
या अश्वारूढ पुतळ्याच्या समोरच्या बाजूला थोरले बाजीरावांची राजमुद्रा कोरण्यात आली आहे. उजवीकडे मल्हारराव होळकर आणि डावीकडे राणोजी शिंदे या मराठेशाहीच्या सरदारांची वर्तुळाकार शिल्पे पाहता येतात. होळकर यांच्या शिल्पाबरोबर प्रमुख मराठा सरदारांची नावे आणि थोरले बाजीराव यांच्या पराक्रमाची गाथा सांगणारे कवी कुसुमाग्रज यांचे काव्य कोरले आहे. तर, शिंदे यांच्या शिल्पाबरोबर छत्रपती शाहूमहाराज, राजे छत्रसाल, इतिहासाचार्य राजवाडे, ग्रांट डंफ आणि फिल्ड मार्शल जनरल रॉबर्ट माँटेमेरी यांचे बाजीराव पेशवे यांच्याविषयीचे गौरवोद्गार पाहण्यास मिळतात.
थोरले बाजीराव यांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या पाठीमागच्या बाजूचे शिल्प निखळले असून तेथे केवळ वर्तुळ मात्र ठळकपणे दिसते. या ठिकाणी हा पुतळा देणगी देणाऱ्या संस्थांची आणि व्यक्तींची नावे आहेत. पुतळा सुरू होताना अश्वाच्या खालची फरशी निखळून गेली असून त्या पाऊलखुणा अजूनही कायम आहेत. तर, अश्वाच्या मागील पायाच्या बाजूस गवताची पाती दिसतात. महापराक्रमी सरसेनानीचे शिल्प घडविणारे शिल्पकार बी. आर. खेडकर यांच्या नावातील काही अक्षरे काळाच्या ओघात गायब झाली आहेत.