आले शिक्षण विभागाच्या मना, तेथे शिक्षकांचे काही चालेना.. अशीच स्थिती सध्या शिक्षण विभागाची झालेली दिसत आहे. शिक्षण विभागाने सुरू केलेल्या ‘एकच ध्यास करू अभ्यास’ अभियानामध्ये शिक्षकांनी उन्हाळी सुट्टीमध्ये विद्यार्थ्यांकडून पाच ते अठरा तास अभ्यास करून घ्यावा आणि कार्यवाहीचा अहवाल पाठवावा, असे नवे गमतीदार फर्मान काढले आहे.
शिवजयंती ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शिक्षण विभागाने एकच ध्यास करू अभ्यास अभियानाची आखणी केली होती. दोन महिने विविध उपक्रम राबवल्यानंतर अभियानाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये विद्यार्थ्यांच्या इयत्तांनुसार अभ्यासाचे नियोजन करण्यात यावे असे परिपत्रक विभागाने शाळांना पाठवले आहे.
इयत्तेनुसार अभ्यासाच्या नियोजनामध्ये तिसरी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचे नियोजन करण्यात यावे, अशा सूचना शाळांना देण्यात आल्या आहेत. तिसरी आणि चौथीच्या विद्यार्थ्यांचा ५ तास अभ्यास घेण्यात यावा, पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांचा ८ तास अभ्यास घेण्यात यावा, नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांचा १२ तास अभ्यास घेण्यात यावा आणि अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचा तब्बल अठरा तास अभ्यास करून घ्यावा अशा सूचना ज्ञानरचनावाद अमलात आणल्याच्या गप्पा करणाऱ्या शिक्षण विभागानेच शाळांना केल्या आहेत. विशेष म्हणजे हा अभ्यास शिक्षकांनी संपूर्ण उन्हाळ्याच्या सुट्टीत करून घ्यायचा आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनापासून (१४ एप्रिल) उन्हाळी सुट्टी संपेपर्यंत विद्यार्थ्यांकडून हा अभ्यास करून घेण्याच्या सूचना शिक्षण विभागाने दिल्या आहेत. त्यामुळे शिक्षण विभागाचे हे अभियान यशस्वी करण्यासाठी उन्हाळ्याच्या सुट्टीत मुले शोधायची कुठे आणि त्यांच्याकडून ५ ते १८ तास अभ्यास करून घ्यायचा कसा. असा नवा प्रश्न शिक्षकांना पडला आहे.
या उपक्रमाची जबाबदारी मुख्याध्यापक, संस्थाचालक आणि शाळा व्यवस्थापन समितीवर सोपवण्यात आली आहे आणि या अभियानाच्या कार्यवाहीचा अहवाल पाठवण्याची सूचनाही करण्यात आली आहे. उन्हाळी सुट्टीतही विद्यार्थ्यांना अभ्यासाला आणि शिक्षकांना कामाला लावण्याच्या शिक्षण विभागाच्या या नव्या फतव्यामुळे शाळा गोंधळात पडल्या आहेत.