स्वारगेट येथील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी प्रस्तावित करण्यात आलेल्या उड्डाणपूल प्रकल्पातील एका पुलाचे काम येत्या आठ ते दहा दिवसात पूर्ण होणार असून त्यानंतर पूल वाहतुकीसाठी खुला होणार आहे. स्वारगेट चौकात इंग्रजी वाय आकारातील दोन पूल तयार होणार असून त्यातील हा एक पूल आहे.
जेधे जौक, स्वारगेट एसटी स्थानक, लक्ष्मीनारायण चित्रपटगृहाचा परिसर, आयकर भवन, सारसबाग रस्ता या सर्व भागातील मोठी वाहतूक व सातत्याने होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेऊन एकात्मिक रस्ते विकास योजनेत या भागात दोन उड्डाणपूल, दोन पादचारी भुयारी मार्ग आणि एक वाहनांसाठीचा भुयारी मार्ग बांधण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. हा संपूर्ण प्रकल्प १५७ कोटी रुपयांचा असून त्यातील एका पुलाचे काम येत्या आठ ते दहा दिवसात पूर्ण होणार आहे. त्यानंतर लगेचच हा पूल वाहतुकीसाठी खुला केला जाईल.
सोलापूर रस्त्यावर असलेल्या आयकर भवनापासून या पुलाची सुरुवात होईल आणि तेथून जेधे चौक ते लक्ष्मीनारायण चित्रपटगृह ते साईमंदिर असा त्याचा टप्पा आहे. पाचशे मीटर लांबीचा हा पूल दुपदरी आहे. या पुलाची दुसरी बाजू सारसबागेकडे उतरणारी असून त्या टप्प्याचेही काम सध्या सुरू आहे. या पुलामुळे हडपसरकडून आलेल्या व धनकवडी, कात्रजकडे जाणाऱ्या वाहनांना आता स्वारगेट चौकातील कोंडी टाळून थेट सातारा रस्त्यावर जाता येणार आहे. सध्या या पुलावर वाहनचालकांसाठी दिशादर्शक व वाहतूक नियमांबाबतचे फलक लावणे, सुरक्षिततेच्या दृष्टीने काही कामे करणे, पुलाखालील सेवा रस्त्यांवरील खड्डे बुजवणे, डांबरीकरण तसेच पादचारी मार्ग वगैरे कामेही सुरू आहेत.

हडपसरहून येणाऱ्या आणि जेधे चौकातून कात्रजकडे जाणाऱ्या तसेच कात्रजकडून येऊन सोलापूर रस्त्यावर जाणाऱ्या वाहनाचालकांना नवीन पूल उपयुक्त ठरणार आहे. पुलाचे काम येत्या आठ-दहा दिवसात पूर्ण होऊन उद्घाटनही लगेच केले जाईल व त्यानंतर तो वाहतुकीसाठी खुला करण्याचे नियोजन आहे.
– महापौर दत्तात्रय धनकवडे