पुणे महापालिकेचे कार्यक्षम अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांची दोन वर्षांतच पुन्हा बदली करण्यात आली आहे. बकोरिया यांची बदली औरंगाबाद महापालिका आयुक्त या पदावर करण्यात आली असून, स्वयंसेवी संस्थांसह शिवसेना आणि काँग्रेसनेही बकोरिया यांच्या बदलीला विरोध केला आहे.
महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्याला बकोरिया यांना नुकतीच दोन वर्षे पूर्ण झाली. बकोरिया यांनी अत्यंत कार्यक्षमपणे पुण्यात काम केले आहे. महापालिकेत आल्यानंतर बकोरिया यांनी गैरप्रकारांना चाप लावला. ठेकेदारांची चुकीची अनेक प्रकरणेही त्यांनी बाहेर काढली. अनेक प्रकरणांमधील चौकशाही त्यांनी योग्य पद्धतीने केल्या.
बकोरिया यांच्या कार्यपद्धतीने धाबे दणालेल्या ठेकेदारांच्या दबावामुळे गेल्या वर्षी बकोरिया यांची बदली करण्यात आली होती. त्या वेळी पुणेकरांनी तीव्र विरोध केल्यामुळे बदली रद्द करण्यात आली. मात्र आता बकोरिया यांची बदली औरंगाबादला करण्यात आली आहे. दोन वर्षांमध्ये कार्यक्षम अधिकाऱ्याची बदली करण्यात आल्यामुळे स्वयंसेवी संस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मात्र, महापालिकेत गेल्या चार वर्षांपासून ठाण मांडून बसलेले माजी मंत्र्याचे जावई अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप यांची बदली का केली जात नाही, असाही प्रश्न विचारण्यात येत आहे.
कार्यक्षम अतिरिक्त आयुक्त बकोरिया यांच्या बदलीला विरोध असल्याचे सजग नागरिक मंचचे विवेक वेलणकर आणि विश्वास सहस्त्रबुद्धे यांनी सांगितले. बकोरिया हे कार्यक्षम आणि प्रामाणिक अधिकारी आहेत. काही अधिकारी चार वष्रे पुण्यात असूनही त्यांची बदली होत नाही. मात्र नागरिकांची कामे तत्परतेने करणाऱ्या अधिकाऱ्याची बदली करण्यात आली आहे. बकोरिया यांच्या बदलीला विरोध असून राज्य शासनाने निर्णय बदलावा, अशीही मागणी असल्याचे वेलणकर म्हणाले.
शिवसेनेचाही विरोध
बकोरिया यांच्या बदलीला शिवसेनेचा विरोध आहे. प्रामाणिकपणे चांगले काम करणाऱ्या अधिकाऱ्याची दोनदा बदली करणे हा चुकीचा निर्णय आहे. शिवसेना चांगल्या अधिकाऱ्यांच्या पाठीशी आहे. बदली रद्द व्हावी यासाठी शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांकडे मागणी करणार असल्याचे शिवसेनेचे शहर संघटक श्याम देशपांडे यांनी सांगितले.
चार वर्षे बदली नाही !
महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी काम करत असलेले राजेंद्र जगताप हे गेली चार वर्षे पुण्यातच आहेत. त्यांचा कार्यकाळ संपलेला असतानाही त्यांची बदली करण्यात येत नाही. जगताप यांची बदली करण्याबाबत सोयीस्कर विसर राज्याच्या नगर विकास विभागाला पडला आहे, असाही आरोप केला जात आहे.

 काँग्रेसचा विरोध
अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांची बदली ही केबल कंपन्या, खोदकाम करणाऱ्या कंपन्या आणि ठेकेदारांच्या दबावातून करण्यात आली आहे. या खोदाई करणाऱ्या कंपन्यांना बकोरिया यांनी कोटय़वधींचा दंड केला असल्यामुळेच बकोरिया यांची बदली झाली असून बदलीला काँग्रेसचा विरोध आहे. बदली रद्द करण्याबाबत प्रदेश स्तरावरून काँग्रेस मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार आहे.
संजय बालगुडे, प्रदेश सचिव, काँग्रेस