‘‘करोनाचा आजार नेमका कसा पसरतो, याची कल्पना आपल्याला नाही. आम्ही परदेशात गेलो नाही. आमच्या निकटवर्तीयांपैकी कोणीही परदेशात गेले नाही. तरी आमच्या कुटुंबापर्यंत हा आजार कसा आला हे आजही कोडे आहे. मात्र, आजाराचे निदान होताच आम्ही डॉक्टरांवर संपूर्ण विश्वास ठेवला आणि सकारात्मक राहिलो. या आजाराचे सावट ओसरेपर्यंत सर्वानीच यंत्रणेला सहकार्य करावे,’’ अशी भावना करोनाच्या विळख्यातून सुटलेल्या रुग्णाने व्यक्त केली आहे.

हा रुग्ण त्याच्या कुटुंबीयांसमवेत संपूर्ण बरा होऊन घरी परतला आहे. आपण करोनाचे रुग्ण आहोत हे समजल्यानंतर पायाखालची जमीन सरकली. मात्र, लगेचच स्वतला सावरले आणि सकारात्मक विचार करण्यास सुरुवात केली. कुटुंबातील आम्हा सगळ्यांनाच लागण झाली होती, त्यामुळे आम्ही सगळे एकमेकांना धीर देणे, सकारात्मक ठेवणे या प्रयत्नांत होतो. पौष्टिक आहार, गरम पाणी पिणे हे पथ्य आम्ही पाळले. नायडू रुग्णालयात असताना तेथील वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी आम्हाला उत्तम सेवा दिली. ते जेवण-नाश्ता देण्यास येत तेव्हा ते खिडकीतून घेणे, दरवाजाबाहेर ठेवायला सांगणे अशी काळजी घेतली. आमच्यामुळे हा संसर्ग त्यांना होऊ नये, कारण रुग्णसेवेचा मोठा ताण त्यांच्यावर आहे, त्यामुळे त्यांनी निरोगी राहणे आवश्यक आहे, ही भावना होती, असेही या रुग्णाने सांगितले.

आमच्या कुटुंबात सर्वात आधी माझ्या पत्नीला संसर्ग झाला. त्या वेळी, मनाने खंबीर राहा, तुला काहीही होणार नाही, असा धीर देऊन मी नायडू रुग्णालयात दाखल होण्यास गेलो. त्या काळात आमचे मन:स्वास्थ्य चांगले राहावे, याची काळजीदेखील डॉक्टरांनी घेतली. या आजाराचे गांभीर्य अनुभवल्यानंतर घरी परतलो असलो तरीदेखील काही दिवस नातेवाईक, शेजारी, मित्रमंडळी यांना न भेटणेच योग्य आहे. तसे करण्यातच आमचे आणि इतरांचे हित आहे, असेही या बऱ्या झालेल्या रुग्णाने नमूद केले.

कृपया घरात बसा!

शासनाने कडक निर्बंध लादूनदेखील अनेक नागरिक तेवढे महत्त्वाचे कारण नसताना घराबाहेर पडत आहेत. पोलिसांशी हुज्जत घालत आहेत. आपल्या सोयीसाठी दिवसरात्र राबणाऱ्या पोलीस आणि इतर यंत्रणांना एवढा त्रास देणे खरोखर योग्य आहे का, याचा विचार करा आणि कृपया घरातच बसा, असे आवाहन या बऱ्या झालेल्या रुग्णाने केले आहे.