मतदान ओळखपत्रासाठी वारंवार अर्ज भरूनही ओळखपत्रावर चुकीचाच पत्ता आल्याने मुकुंदनगरमधील सुजय गार्डन सोसायटीतील रहिवासी वैतागले आहेत. ओळखपत्रात चुकाच होणार असतील तर पुन्हा अर्ज भरून तरी काय उपयोग, अशी या रहिवाशांची भावना झाली आहे.
पर्वती विधानसभा मतदारसंघाच्या प्रभाग क्रमांक ६६ मधील सुजय गार्डन सोसायटीतून ऑक्टोबर महिन्यात दोनशे रहिवाशांनी मतदान ओळखपत्रासाठीचे अर्ज भरले होते. या सर्व रहिवाशांना ओळखपत्रे वाटण्यात आली असून त्यांत त्यांचा पत्ता ‘औद्योगिक वसाहत’ असा छापण्यात आला आहे.
सोसायटीतील रहिवासी हेमंत मसालिया यांच्या कुटुंबाने ओळखपत्रासाठी तब्बल तीन वेळा अर्ज भरला आहे. पहिल्या वेळी वाटण्यात आलेल्या ओळखपत्रावर त्यांचा पत्ता ‘१८८ गुलटेकडी’ होता, तर दुसऱ्या वेळी ‘शिवशंकर सभागृह’ असा पत्ता छापून आला. आता तिसऱ्या वेळी ओळखपत्रासाठी अर्ज भरल्यावर पत्ता ‘औद्योगिक वसाहत’ असा आला आहे.
सामाजिक कार्यकर्ते भरत सुराणा यांनी दिलेल्या माहितीनुसार, निवडणूक आयोगाकडे विचारणा केली असता या सोसायटीच्या पत्त्याची आयोगाच्या सॉफ्टवेअरमध्ये नोंदच नसल्याचे सांगण्यात आले. मात्र यापूर्वी या सोसायटीतील काही रहिवाशांना बरोबर पत्ता छापलेली ओळखपत्रे मिळाली असल्याने सॉफ्टवेअरमध्ये पत्त्याची नोंद नसणे शक्य नाही, असे सुराणा यांनी सांगितले.