संकेतस्थळावर वेश्या व्यावसायासंदर्भातील जाहिराती शोधून त्यावर कारवाई करण्यास सामाजिक सुरक्षा विभागाने सुरूवात केली आहे. पुना एसकॉर्टवरील एका संकेस्थळावर वेश्या व्यावसाय जाहिरात देऊन मुली पुरविणाऱ्यास बालेवाडी परिसरात बुधवारी अटक करण्यात आली. त्याच्या ताब्यातून दोन तरुणींची सुटका करण्यात आली आहे.
ओमप्रकाश उर्फ राजू चेलाराम निकुम (वय २४, रा. पाली राजस्थान) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याबाबत समाजिक सुरक्षा विभागाचे पोलीस निरीक्षक संजय निकम यांनी सांगितले की, संकेतस्थळावर आणि इतर ठिकाणी येणाऱ्या इस्कॉर्टच्या जाहिरातीवर पोलिसांकडून लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. गुगलवर शोधत असताना पुना एसकॉर्ट संकेतस्थळावर लोकॉन्टो इन नावाचे पेज होते. त्यावर हिंजवडी भागात वेश्या व्यावसायासाठी मुली पुरविल्या जातील, अशी जाहिरात देण्यात आली होती. त्या जाहिरातीवर राजू नावाच्या व्यक्तींचा एक मोबाईल क्रमांक देण्यात आला होता. त्याबाबत सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी जगताप व त्यांच्या पथकाने माहिती काढण्यास सुरूवात केली. राजू नावाच्या व्यक्तीला फोन केला असता त्याने बालेवाडी परिसरातील एका सदनिकेत दोन मुली दाखविल्या. त्यावेळी छापा टाकून ही कारवाई करण्यात आली. यातील सुटका केलेली एक मुलगी नाशिक तर दुसरी गोरेगाव येथील आहे. नाशिक येथील मुलीची आर्थीक परिस्थती हालाखीची आहे. ती ग्रुप डान्सर म्हणून काम करते. मात्र, पैशाची आवश्यकता असल्यामुळे तेथील एका तरुणीने आरोपीचा नंबर दिला. ती या ठिकाणी आली. चौदा दिवसांसाठी तिला ३५ हजार रुपयांचा करार करण्यात आला होता. हा व्यावसाय साधारण दोन ते तीन महिन्यांपासून सुरू आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.