रेडिओ अ‍ॅस्ट्रॉनॉमी या विषयाला भारतात ५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने पुण्यात चार दिवस कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून, त्यासाठी जगभरातून या विषयातील २०० संशोधक येणार आहेत. या काळात पुण्यात प्रा. फिल डायमंड, प्रा. रॉन एकर्स या प्रसिद्ध शास्त्रज्ञांसह इतर संशोधकांची जाहीर व्याख्याने होणार आहेत.
भारतात रेडिओ अ‍ॅस्ट्रॉनॉमी या विषयाला १९६३ साली सुरुवात झाली. त्याला आता पन्नास वर्षे होत आहेत. त्यानिमित्त येत्या सोमवारपासून विविध परिषदा व कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. याबाबत राष्ट्रीय नॅशनल सेंटर फॉर रेडिओ अ‍ॅस्ट्रॉनॉमीचे (एनसीआरए) पुण्यातील केंद्र संचालक डॉ. एस. के. घोष, प्रा. जयराम चेंगलूर, प्रा. यशवंत गुप्ता यांनी माहिती दिली. ‘एनसीआरतर्फे नारायणगावजवळ खोडद येथे उभारण्यात आलेल्या जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप (जीएमआरटी) अर्थात महादुर्बिणीची उभारणी करण्यात आली आहे. ही महादुर्बीण निरीक्षणांसाठी आंतरराष्ट्रीय समुदायाला खुली केली, त्यालासुद्धा आता दहा वर्षे उलटली आहेत. महादुर्बिणीच्या उभारणीमुळे भारताने या विषयात जगात आघाडी घेतली आहे. मात्र, आता इतर देशही या दृष्टीने प्रगती करत आहेत. त्यामुळे पुढच्या काळात ही आघाडी टिकवणे हे आव्हान असेल,’ असे चेंगलूर यांनी सांगितले.
हा विषय विद्यार्थी आणि इतर नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी गेल्या काही वर्षांत बरेच प्रयत्न करण्यात आले, असे प्रा. गुप्ता यांनी सांगितले. विशेषत: महादुर्बिणीला आतापर्यंत लाखो विद्यार्थी व नागरिकांनी भेट दिली आहे. त्यांच्यासाठी आठवडय़ातील एक दिवस राखून ठेवला जातो. त्या दिवशी मोठय़ा प्रमाणात गर्दी होते. हा विषय अशाप्रकारे लोकांपर्यंत पोहोचवल्याने त्याचा प्रसार होण्यास मदत झाली आहे, असे त्यांनी सांगितले.
महादुर्बिणीवर जाहीर व्याख्यान
‘स्केअर किलोमीटर अ‍ॅरे’ ही जगातील सर्वात मोठी महादुर्बीण ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका देशांमध्ये मिळून उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पाचे महासंचालक प्रा. फिल डायमंड यांचे सोमवारी (९ डिसेंबर) पुणे विद्यापीठ आवारातील आयुकाच्या चंद्रशेखर सभागृहात सायं. ६.३० वाजता जाहीर व्याख्यान होणार आहे. या व्याख्यानात ते हा अतिभव्य प्रकल्पाची माहिती देणार आहेत.