पुणे : बारामती येथे होणाऱ्या नमो महारोजगार मेळाव्यात रोजगार देण्यासाठी सहभागी झालेल्या काही कंपन्यांची माहिती इंटरनेटवर सापडत नाही. तसेच काही कंपन्यांच्या नावाशी साधर्म्य असलेली वेगळीच कंपनी दिसून येत आहे. रिक्त जागांमध्ये प्रत्यक्ष नोकऱ्यांऐवजी ३० हजार ‘ट्रेनी’ पदे भरली जाणार आहेत. त्यामुळे या रोजगार मेळाव्यातील सहभागी कंपन्यांवरच आम आदमी पक्षाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

माहिती अधिकार कार्यकर्ते आणि आम आदमी पक्ष महाराष्ट्राचे उपाध्यक्ष विजय कुंभार यांनी याबाबत आक्षेप घेतला आहे. बारामतीमधील नमो महारोजगार मेळाव्याच्या सुरस आणि चमत्कारिक कहाण्या आता पुढे येत आहेत. या मेळाव्यातून सुमारे ४३ हजार लोकांना रोजगार मिळेल असे सांगितले जात होते. मात्र प्रत्यक्षात वस्तुस्थिती वेगळीच आहे. रिक्त जागांचा तक्ता पाहिला, तर यातील जवळपास ३० हजार जागा या नोकऱ्या नसून ट्रेनी पदे आहेत. यापैकी भोसरीतील Ligmus प्रा. लि. ही कंपनी १५ हजार प्रशिक्षीत पदे भरणार आहे. बारामतीची Giles प्रा. लि. ही कंपनी एक हजार ट्रेनी पदे भरणार असली, तरी एवढा मोठ्या प्रमाणावर ट्रेनी उमेदवार घेणाऱ्या या दोन्ही कंपन्यांबाबत इंटरनेटवर काही माहिती सापडली नाही. कदाचित स्पेलिंग मिस्टेक असू शकते. रोजगार मेळाव्यात नाव दिलेली Giles प्रा. लि. कंपनी ही इंटरनेटवर Gils प्रा. लि. या नावाने सापडली आहे. आश्चर्य म्हणजे या कंपनीच्या सर्व नऊ महिला-पुरुष संचालकांची नावे डी. विल्यमसन आहेत, असे कुंभार यांनी सांगितले.

हेही वाचा – पुण्यात अघोषित पाणीकपातीला सुरुवात : येत्या बुधवारी ‘या’ भागातील पाणी बंद

हेही वाचा – बारामतीमधील नमो रोजगार मेळाव्याच्या निमंत्रणपत्रिकेत शरद पवार यांचे नाव; जिल्हा प्रशासनाकडून सुधारित निमंत्रणपत्रिका

याबाबत कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता पुणे विभागाच्या उपायुक्त अनुपमा पवार यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी प्रतिसाद दिला नाही.