पुणे : बारामती येथे होणाऱ्या ‘नमो महा रोजगार मेळाव्या’साठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना या कार्यक्रमाचे निमंत्रण न देण्यावरून वाद सुरू झाला असतानाच जिल्हा प्रशासनाकडून पवार यांना निमंत्रण देण्यात आले आहे. जिल्हा प्रशासनाकडून मेळाव्याची सुधारित निमंत्रणपत्रिका प्रसिद्ध करण्यात आली आहे.

कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभागाच्या वतीने विभागस्तरीय नमो महारोजगार मेळावा बारामती येथे आयोजित करण्यात आला आहे. हा मेळावा दोन आणि तीन मार्च रोजी होणार आहे. या मेळाव्याचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे उपस्थित राहणार आहेत.

हेही वाचा – पुण्यात कुठे, किती पडला पाऊस? पावसाचा अंदाज काय?

या शासकीय कार्यक्रमासाठी पुणे पिंपरी चिंचवड आणि उर्वरित ग्रामीण भागातील सर्व लोकप्रतिनिधी म्हणजेच लोकसभा आणि राज्यसभेचे खासदार आणि विधानसभा आणि विधान परिषदेचे आमदार यांना निमंत्रण देण्यात आले आहे. मात्र या कार्यक्रमाचे निमंत्रण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना दिले नसल्याचे पुढे आले होते. बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि अ‍ॅड. वंदना चव्हाण यांना निमंत्रण दिले असताना पवार यांचे नाव निमंत्रण पत्रिकेत नसल्याने वाद सुरू झाला होता. दरम्यान, कोणत्याही शासकीय कार्यक्रमांसाठी नाव निमंत्रण पत्रिकेत छापण्यात येऊ नये, असे स्वत: पवार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजशिष्टाचार विभागाला यापूर्वीच कळविले होते. त्यामुळे त्यांचे नाव टाकण्यात आले नव्हते. मात्र सुधारित निमंत्रणपत्रिकेत नाव टाकले जाईल, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले होते. त्यानुसार नव्या निमंत्रणपत्रिकेत पवार यांच्या नावचा समावेश करण्यात आला आहे.

हेही वाचा – पिंपरी : अखेर पाच वर्षांनी पोलीस आयुक्तालयाला मिळाली हक्काची जागा, ‘या’ ठिकाणी होणार आयुक्तालय

दरम्यान, पवार यांनी स्वत:ही या मेळाव्याला उपस्थित राहण्याची इच्छा पत्राद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे व्यक्त केली असून मेळाव्याला उपस्थित मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातील मंत्र्यांना पवार यांनी स्नेहभोजनचे आमंत्रण दिले आहे.