लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पिंपरी : मालमत्ता कर न भरलेल्या आणि कराची दहा हजारांपेक्षा अधिक थकबाकी असलेल्या ७५ हजार ८५८ मालमत्ताधारकांनी महापालिकेचा ७१७ कोटी ३२ लाख रुपयांचा मालमत्ता कर थकविला आहे. या मालमत्ताधारकांना देयकाबरोबरच जप्तीपूर्व नोटिसा देण्यास कर संकलन आणि कर आकारणी विभागाने सुरुवात केली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात निवासी, व्यावसायिक, औद्योगिक, मोकळी जमीन, मिश्र यांसह विविध अशा सहा लाख २५ हजार मालमत्ता आहेत. या मालमत्ताधारकांकडून कर संकलन विभागाच्या वतीने कर वसूल करण्यात येतो. सरत्या २०२३-२४ या आर्थिक वर्षात सहा लाख २५ हजार मालमत्तांपैकी पाच लाख ११ हजार १५४ मालमत्ताधारकांनी कराचा भरणा केला. ९७७ कोटी ५० लाख रुपयांचा कर तिजोरीत जमा झाला. मात्र, ७५ हजार ८५८ मालमत्ताधारकांनी महापालिकेचा ७१७ कोटी ३२ लाख रुपयांचा मालमत्ता कर थकविला आहे. सर्वाधिक दहा हजार २०९ थकबाकीदार हे चिखली विभागात आहेत. थकबाकीदारांकडून कर वसूल करण्यात अपयश आल्याने कर संकलन विभाग एक हजारांचे उद्दिष्ट पूर्ण करू शकला नाही.

आणखी वाचा-पुणे : हडपसर वैदुवाडी परिसरात झोपड्यांना आग

बचत गटातील महिलांमार्फत २०२४-२५ या आर्थिक वर्षातील मालमत्ताकराच्या देयकांचे वाटप सुरू करण्यात आले आहे. घरोघरी जात देयकांचे वितरण केले जात आहे. सव्वासहा लाख देयकांचे पुढील दहा दिवसांत वाटप पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचे सहायक आयुक्त नीलेश देशमुख यांनी सांगितले.

देयकांसोबत मतदार जनजागृती

पिंपरी-चिंचवड शहर मावळ, शिरूर आणि बारामती या तीन लोकसभा मतदारसंघात विभागले आहे. ७ मे रोजी बारामतीमध्ये तर मावळ आणि शिरूरमध्ये १३ मे रोजी मतदान होणार आहे. मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी कर संकलन विभागाकडून देयकांसोबत मतदार जनजागृती केली जात आहे. जिल्हा निवडणूक कार्यालयाने दिलेली मतदान जनजागृतीची पत्रकेही घरोघरी देण्यात येत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 717 crores tax due to 76 thousand property owners notices from the municipal corporation pune print news ggy 03 mrj