खासगी रुग्णालयातील गर्भपात केंद्रे गर्भपातांच्या नोंदी ठेवण्यात हलगर्जीपणाच करत असल्याचे समोर येत आहे. वैद्यकीय गर्भपात केंद्राची नोंदवही (एमटीपी रजिस्टर) हे एमटीपी कायद्यानुसार कायदेशीर पुरावा मानले जात असूनही नोंदी ठेवण्यात कसूर करणाऱ्या केंद्रांना वठणीवर आणण्यासाठी पालिकेकडे मात्र कोणताही उपाय नाही.
शहरातील तीन गर्भपात केंद्रांच्या एमटीपी नोंदवहीत या केंद्रांविषयी गंभीर शंका घ्यावी अशा नोंदी करण्यात आल्याचे नुकतेच पालिकेच्या निदर्शनास आले. सूतिका सेवा मंदिर, मीरा रुग्णालय आणि समर्थ रुग्णालय अशी या गर्भपात केंद्रांची नावे आहेत. या केंद्रांच्या नोंदींविषयी आक्षेप घेऊन पालिकेने त्यांना नोटिस बजावून त्यांच्याकडून खुलासे मागितले. या प्रकरणी गर्भपात कायद्याचा भंग झाला का हे तपासण्यासाठी पुन:पुन्हा या केंद्रांच्या कागदपत्रांची पडताळणीही झाली. माहिती अधिकार कार्यकर्ते गणेश बोऱ्हाडे यांना माहितीच्या अधिकारात पालिकेकडून ही माहिती मिळाली आहे. एमटीपी नोंदवहीतील नोंदींच्या महत्त्वाबद्दल गर्भपात केंद्रांना समज देण्यासाठी मात्र पालिका काहीच करू शकत नसल्याचे या प्रकरणांवरून समोर आले.
यासंबंधी विचारणा केली असता, ‘एमटीपी नोंदवहीतील नोंदी चुकवणाऱ्यांवर अथवा अधर्वट नोंदी करणाऱ्यांवर कारवाई करण्याची तरतूद एमटीपी कायद्यात नाही,’ असे आरोग्य प्रमुख डॉ. एस. टी परदेशी यांनी सांगितले.
 
गर्भपाताच्या नोंदीविषयीची ताजी प्रकरणे अशी :
प्रकरण क्र. १
‘सूतिका सेवा मंदिर’ या गर्भपात केंद्रातील नोंदवहीत चक्क २१, २२ आणि २३ आठवडय़ांनंतरच्या गर्भपातांच्या नोंदी होत्या. प्रत्यक्षात २० आठवडय़ांनंतरचा गर्भपात हा कायद्याने गुन्हा मानला जातो. याविषयी पालिकेने केंद्राला जानेवारी २०१४ मध्ये नोटिस बजावली असता या आक्षेपार्ह नोंदी लेखनिक वर्गातील सेवकाच्या हलगर्जीपणाने झाल्या असल्याचे कारण केंद्राने खुलाशात नमूद केले. गर्भपात करण्यासाठीच्या कारणांचा सुस्पष्ट उल्लेख केंद्राने नोंदवहीत केला नसल्याचा आक्षेपही पालिकेने घेतला. १२ आठवडय़ांनंतरच्या गर्भपातांसाठी दोन स्त्री व प्रसूतिरोग तज्ज्ञांची मते व स्वाक्षऱ्या घेणे कायद्याने बंधनकारक असते. या स्वाक्षऱ्याही नोंदवहीत नव्हत्या. गर्भपात केंद्राने आपल्या खुलाशात हे सर्व आक्षेप मान्य केले.
प्रकरण क्र. २
मीरा रुग्णालयातील गर्भपात केंद्राच्या नोंदवहीतही २१ आठवडे ६ दिवसांनंतरच्या गर्भपाताचा उल्लेख होता.
प्रकरण क्र. ३
समर्थ रुग्णालयातील गर्भपात केंद्राच्या नोंदवहीतील ७० टक्के रकाने भरलेलेच नसल्याचे पालिकेच्या तपासणीत दिसून आले होते. गर्भपात करणाऱ्या डॉक्टरांचे पूर्ण नावही अनेक ठिकाणी नमूद केले नव्हते. केंद्राचे प्रमुख डॉ. राजेंद्र गुंडावार यांनी घेतलेल्या प्रशिक्षणानुसार त्यांना केवळ १२ आठवडय़ांपर्यंतचे गर्भपात करण्याची परवानगी असल्याचे डॉ. गुंडावार यांनीच पालिकेकडे सादर केलेल्या प्रमाणपत्रात म्हटले आहे. परंतु या केंद्रात एप्रिल २०१३ ते ऑक्टोबर २०१३ या कालावधीत १२ आठवडय़ांनंतरचे ३२ गर्भपात करण्यात आल्याची नोंद केंद्राच्या नोंदवहीत असून यातील प्रत्येक गर्भपात करणाऱ्या डॉक्टरांच्या नावांमध्ये डॉ. गुंडावार यांचे नाव लिहिले आहे. हे गर्भपात करताना केंद्राने दोन स्त्रीरोग व प्रसूतितज्ज्ञांची मान्यताही न घेतल्याचा आक्षेप पालिकेनेच केंद्राला बजावलेल्या नोटिशीत घेतला आहे.
उपआरोग्य प्रमुख अंजली साबणे म्हणाल्या, ‘‘या तीनही प्रकरणांमध्ये संबंधित केंद्रांकडून कागदपत्रे मागवून त्याचा अभ्यास केला असता कोणत्याही प्रकरणात गर्भपात कायद्याचा भंग झालेला नसल्याचे दिसून आले. २० आठवडय़ांनंतरच्या गर्भपाताची नोंद पडताळून पाहण्यासाठी संबंधित रुग्णाचा सोनोग्राफी अहवाल तपासला आहे. त्यावरून हा गर्भपात २० आठवडय़ांपेक्षा अधिक कालावधीचा नसल्याचे लक्षात आले.’’