पुणे : बारामतीमध्ये उमेदवार न देण्याबाबत शरद पवार यांच्याशी चर्चा झाली नव्हती. पण, सुप्रिया सुळे या मला भेटल्या होत्या. तसेच कोल्हापूरमध्ये शाहु महाराजांना पाठिंबा देण्याची चर्चा सुरू होती, तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील मला म्हणाले, की आमची लढाई मोठी आहे. आमच्या बाजूने तुम्ही आहात, असे दाखवा. त्यामुळे बारामतीमध्ये उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला, असा गौप्यस्फोट वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी सोमवारी केला.
वंचित बहुजन आघाडीचे पुण्यातील उमेदवार वसंत मोरे यांच्या यांच्या प्रचाराचा प्रारंभ सोमवारी ॲड. आंबेडकर यांच्या उपस्थितीत करण्यात आला. त्यानिमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत आंबेडकर बोलत होते. ते म्हणाले, ‘सुप्रिया सुळे मला भेटल्या होत्या. आता त्या कुठे भेटल्या याचा काळ-वेळ विचारू नका. तसेच जयंत पाटील यांनी विनंती केली होती. हा निर्णय आम्ही भविष्यातील काही राजकीय धोरण लक्षात घेऊन घेतला आहे. हा निर्णय भावूक नसून धोरणाच्या दृष्टिकोनातून घेतला आहे. शरद पवार हे बारामतीमध्येच अडकून पडले असून वंचितसाठी यंदा सकारात्मक वातावरण आहे. त्यामुळे आम्ही यंदा खाते उघडू. मनसेच्या अजानच्या भूमिकेत वसंत मोरे यांनी मुस्लिमांची बाजू घेतल्याने त्यांना डावलण्यात येत होते. हे मतदार वसंत मोरे यांना मतदान करतील.’
दरम्यान, उत्तर-मध्य मुंबईतून भाजपने ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांना उमेदवारी दिली आहे. माणूस म्हणून त्यांच्यावर काही आक्षेप घेता येणार नाही. लोकांना त्यांच्या माध्यमातून एक पर्याय आहे. देशातील तरुणांमध्ये अस्वस्थता आहे. त्यामुळे दोन टप्प्यांतील मतदानाची टक्केवारी कमी झाली आहे. भाजपविरोधातील मुद्दे उपस्थित करताना काँग्रेस आणि ठाकरे गट अपयशी ठरले आहेत, अशी टीका आंबेडकर यांनी या वेळी केली.