अनधिकृतरीत्या चालवल्या जाणाऱ्या प्रयोगशाळांच्या मुद्दय़ावरुन शासनाने बुधवारी ‘डीएमएलटी’ अर्हताधारक व्यक्तींना रोगनिदान चाचण्यांचे अहवाल प्रमाणित करण्याची परवानगी नाही, अशी तंबी देणारे परिपत्रक काढले व लगेच गुरूवारी दुसरा शासन निर्णय काढून ते मागेही घेतले गेले. आता ग्रामीण भागातील पॅथोलॉजिस्ट डॉक्टरांची कमतरता पाहता ‘डीएमएलटी’ धारकांना काही अटींसह रोगनिदान अहवालांवर स्वाक्षरी करण्याची परवानगी देता येईल का, याचाही विचार सुरू आहे. या पाश्र्वभूमीवर रोगनिदान प्रयोगशाळांचे सध्याचे एकूण चित्र काय, चाचणीच्या अचूक अहवालांसाठी उपाय काय आणि रुग्णांनी चाचणी करताना काय पहायला हवे, या गोष्टींविषयी ‘लोकसत्ता’ने ‘इंडियन असोसिएशन ऑफ प्रॅक्टिसिंग पॅथोलॉजिस्ट्स’चे अध्यक्ष डॉ. श्रीनिवास गोखले यांच्याशी संवाद साधला.

’वैद्यकीय प्रयोगशाळा चालवण्याबाबतचे नियम काय व त्यातील गैरप्रकार कुठले?

environmentalist initiative to fill dry water bodies for wildlife
उरण : वाढल्या उन्हाच्या झळा, वन्यजीवांसाठी भरला पाण्याचा तळा
Slum Improvement Board, contract,
मुंबई : झोपडपट्टी सुधार मंडळातील ‘कंत्राटा’साठी गोळीबार!
students election duty marathi news
निवडणुकीच्या कामासाठी आता विद्यार्थ्यांचीही नियुक्ती
stock market, 3 7 crore dmat accounts
सरलेल्या आर्थिक वर्षात ३.७ कोटी डिमॅट खात्यांची भर

भारतीय वैद्यक परिषदेच्या नियमानुसार देशात रोगनिदान प्रयोगशाळा काढणारी व्यक्ती एमबीबीएस डॉक्टर असावी लागते व त्यानंतर त्याने ‘पॅथोलॉजी’ विषयात पदव्युत्तर पदवी (एमडी) किंवा पदविका घेतलेली असावी लागते. पण आपल्याकडे याबाबतचे नियम पाळले जात नसल्यामुळे कुणीही प्रयोगशाळा काढते. प्रयोगशाळा सुरू करताना त्याची नोंदणी करुन घेणारी किंवा परवाना देणारी यंत्रणा अस्तित्वात नाही. त्यामुळे संबंधित व्यक्तीची अर्हता तपासलीच जात नाही. शिवाय, हल्ली वैद्यकीय प्रयोगशाळांमध्ये अनेक चाचण्या मशिनच्या साहाय्याने केल्या जातात व त्याचे परिणामही मशिनच देते. त्यामुळे कुणीही प्रयोगशाळा चालवली तर काय बिघडले अशी धारणा तयार होते. वैद्यकीय तंत्रज्ञ असलेल्या व्यक्तीने प्रयोगशाळा काढायची आणि नियमानुसार पॅथोलॉजिस्ट डॉक्टरांनी चाचण्यांचे अहवाल प्रमाणित करायचे असेही सुरू झाले. परंतु त्यातही काही पॅथोलॉजिस्ट डॉक्टरांकडून गैरप्रकार झाले. पॅथोलॉजिस्टच्या देखरेखीखालीच चाचण्या व्हायला हव्यात असे ‘एमसीआय’ म्हणते. परंतु रुग्ण कोण याचा पत्ताही नसताना तंत्रज्ञाने तयार केलेला वैद्यकीय अहवाल न वाचता स्वाक्षरी करणे हे वाढते आहे. काही डॉक्टर अनेक प्रयोगशाळांमधील अहवाल प्रमाणित करतात. प्रत्यक्षात एका डॉक्टरला सर्व ठिकाणी जाऊन चाचण्यांवर देखरेख करुन अहवाल पडताळणे शक्यच नाही. त्यामुळे या क्षेत्रावर नियंत्रण ठेवणारी यंत्रणा आली तर संबंधित व्यक्तींची अर्हता, अनुभव, प्रयोगशाळेची जागा अशा विविध गोष्टींच्या आधारे परवाना देण्याची प्रक्रियाही सुरू होऊ शकेल. हे झाल्यास शैक्षणिक अर्हता पूर्ण न करणाऱ्या व्यक्तींना मुळातच परवाना मिळणार नाही.

’चाचण्यांचे अहवाल अचूक येण्यासाठी प्रयोगशाळेकडून कोणती काळजी घेतली जावी?

चाचण्यांच्या अहवालांची अचूकता तपासण्यासाठी बाह्य़ व अंतर्गत अशा दोन प्रकारच्या यंत्रणा असतात. विविध कंपन्या ही अचूकता पडताळण्यासाठी सेवा देतात व त्यातील काही आंतरराष्ट्रीय देखील आहेत. बऱ्याच प्रयोगशाळा अशा यंत्रणेची मदत घेतात. काही वेळा दोन-तीन प्रयोगशाळा एकमेकांमध्ये चाचण्यांचे अहवाल पडताळून अचूकता तपासतात. चाचणी योग्य प्रकारे व्हावी यासाठी प्रयोगशाळेतील कर्मचाऱ्यांची अर्हता योग्य हवी. तसेच चाचण्यांसाठी वापरली जाणारी द्रव्ये, किट्स, उपकरणे व नीडल्स व सिरिंजेस देखील चांगल्या दर्जाची असणे गरजेचे. त्यात प्रयोगशाळेने खर्चकपात करणे योग्य नाही. कारण अशा लहान-लहान गोष्टींवर चाचणीचा अहवाल बदलू शकतो. उपकरणांची देखभालही वेळोवेळी होणे आवश्यक असते.

’रुग्णांनी चाचणी करण्यापूर्वी काय विचार करावा?

चाचणी करण्यापूर्वी व केल्यानंतर रुग्णाच्या मनातील शंका विचारण्यासाठी प्रयोगशाळेत डॉक्टर उपलब्ध आहे का, ही बाब महत्त्वाची. चाचणी करताना रुग्णाला एखादे औषध सुरू असेल तर त्याबाबत त्याने चाचणीपूर्वी कल्पना देणे आवश्यक ठरते. चाचणीची वेळ काय असावी, ती उपाशीपोटी करायची की खाल्ल्यावर, खाल्ल्यावर करायची असेल तर नेमक्या किती वेळाने, चाचणीपूर्वी आपल्याला सुरू असलेले औषध घ्यावे की नाही, अशा गोष्टी अहवालाच्या अचूकतेसाठी महत्त्वाच्या असतात. त्या अहवालावर रुग्णाचे पुढचे उपचार अवलंबून असल्यामुळे या शंका दूर होणे गरजेचे असते.

मुलाखत : संपदा सोवनी