श्रीराम ओक shriram.oak@expressindia.com

घरातून ऑफिसला जाताना चार्जिगला लावलेला मोबाइल घरात विसरण्यापासून एखाद्या मिटिंगला गेल्यावर महत्त्वाची कागदपत्रे घरात किंवा ऑफिसमध्ये विसरल्याचे लक्षात येणे, हे आणि असे प्रसंग घडल्याचे तुम्हाला आठवत असेलच. याशिवाय बाजारात गेले असताना घेतलेली वस्तू दुकानातच विसरण्यापासून, एखादी वस्तू खरेदी करायचीच राहिली असेही अनेकानेक प्रसंग तुम्हाला सहजतेने आठवतील. हे विसरणे किंवा विस्मरण अनेकदा दमणूक, ताण-तणाव, मन दुसऱ्याच विचारांत गुंतलेले असणे वगैरेमुळे देखील होऊ शकते. पण सध्या माणसाच्या वाढलेल्या आयुर्मानाबरोबरच नवीन-नवीन आजार आपल्याला बघायला मिळतात. त्यातलाच एक आजार म्हणजे विस्मरणाचा. या आजारावर मात करायची असेल, तर त्यासाठी ‘अल्झायमर्स सपोर्ट ग्रुप’ हा स्वमदत गट कार्यरत आहे.

‘आठवण’ या शब्दाबरोबरच अनेक गोष्टी आठवायला लागतात. यातील काही आठवणी आनंदी वातावरण निर्माण करतात, तर काही आठवणी मात्र त्रासदायक असतात. त्या त्रासदायक आठवणी यायला लागल्या की आपल्याला आपल्याच स्मरणशक्तीचा राग येऊ लागतो. संगणकामध्ये जसे नको असलेल्या गोष्टी खोडून टाकण्याची (डिलिट करण्याची) सोय असते, तशी सोय आपल्याही मेंदूत असावी असे वाटू लागते. पण सुदैवाने किंवा दुर्दैवाने तशी जरी सोय नसली, तरी वाढत्या वयात विस्मृतींचा जडलेला आजार नको असलेल्या आठवणींच्या गोष्टींपासूनच सुटका तर करून देतोच पण त्याबरोबरच चांगलेही काही आठवू देत नाही. या आजारात थोडय़ा काळासाठी स्मृतींवर परिणाम होतो. कधीतरी अशा घटना घडणे शक्य आहे, पण जर असे प्रसंग वारंवार घडायला लागले, तर त्या व्यक्तीला विस्मरणाचा आजार म्हणजेच डिमेन्शिया, अल्झायमर तर नाही ना झाला, याची खातरजमा करून घेण्याबरोबरच, त्यावर उपाययोजना देखील करण्याची आवश्यकता असते. पण या संदर्भात अशा व्यक्तीची मदत कोण करणार, हा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे आणि येथेच वैद्यकीय सेवांच्या बरोबरीने ‘अल्झायमर्स सपोर्ट ग्रुप’ मदतीचा हात देतो.

विस्मरणाचे अनुभव वयपरत्वे वाढत जातात असे कित्येकांना वाटते. ज्येष्ठांना विस्मरणाचा आजार होण्याची शक्यता जास्त असली, तरी प्रत्येक वृद्धाला हा आजार होतोच असे नाही. पण ज्यांना हा आजार होतो, तो आधी डिमेन्शियाकडून अल्झायमरकडे घेऊन जातो.  डिमेन्शिया हा मेंदूचा एक आजार आहे. त्यात स्मरणशक्तीवर हल्ला होऊन विचार क्षमता, नियोजनक्षमता, संवादक्षमता, सारासार विचार शक्ती इत्यादी मेंदूच्या क्षमतांवर परिणाम होतो. जसे एकाग्रतेत कमतरता, स्वभावात बदल, उत्साह कमी होणे किंवा निराशा वाटणे, रोजच्या ओळखीच्या रस्त्यावर गोंधळायला होणे, नेहमीची कामे करणे अवघड जाणे, संभाषण करताना गडबडून जाणे, अलीकडे घडलेले प्रसंग न आठवणे वगैरे. काही जणांमध्ये विस्मरण जरा अतीच होते. सातत्याने येणाऱ्या विस्मरणाच्या अनुभवामधून आत्मविश्वास आणि स्वावलंबनावर परिणाम व्हायला लागतो. अशा वेळी विस्मरण गंभीर आहे का हे वेळीच बघितल्यास त्यावर औषध योजना लवकर चालू करता येते आणि वेळेत केलेल्या या औषधांचा त्या व्यक्तीस विस्मरणाच्या तीव्रतेतून बाहेर काढण्यास मदत होते.

विस्मरण हे वयानुसार होणारच म्हणून पहिली दोन-तीन वर्षे ज्येष्ठ नागरिक तज्ज्ञांकडे, डॉक्टरांकडे जाण्याचे टाळतात. तोपर्यंत आजार पुढच्या टप्प्यात गेलेला असतो. हे टाळले जावे यासाठी जन-जागृती होणे अधिक महत्त्वाचे ठरते आणि हेच कार्य या स्वमदत गटातर्फे केले जाते. व्याख्यानांपासून प्रदर्शनापर्यंत आणि अभिवाचनापासून पथनाटय़ापर्यंत विविध प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन या गटामार्फत करण्यात येते.  स्वमदत गटामार्फत ‘भूली यादें’ या पथनाटय़ाचे सादरीकरण विविध ठिकाणी करण्यात येते. प्रदीप ओक यांच्या कवितेने नटलेल्या या पथनाटय़ाचे लेखन नीता केळकर आणि यशश्री हुद्दार यांनी केले असून या पथनाटय़ात त्यांच्यासह सुचेता बापट, अनुजा केळकर याही सादरीकरणात सहभागी होतात. या पथनाटय़ासह स्वमदत गटाच्या इतरही उपक्रमांची माहिती हवी असल्यास ९०११०३९३४५ या क्रमांकावर संपर्क साधता येईल.

सादरीकरणाशिवाय विस्मरणाच्या वाढत्या तक्रारी घेऊन येणाऱ्यांना योग्य मदत मिळावी, या हेतूने २०१० साली दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या न्यूरॉलॉजी विभागामार्फत मेमरी क्लिनिक सुरू करण्यात आले आहे. याचे काम मंगला जोगळेकर या अतिशय आस्थेने याचे पाहत आहेत.

रुग्णाला विस्मरण तर झालेलेच असते, पण त्याला जेवढे स्मरणात आहे ते टिकवून ठेवण्याचे प्रयत्न ‘मेमरी लॅब’ च्या मदतीने केले जातात. रुग्णाच्या क्षमतेनुसार, आवडीनुसार, आजार कोणत्या टप्प्यात आहे हे जाणून घेऊन त्याप्रमाणे मेंदूला चालना देणारे व्यायाम रुग्णाकडून करून घेतले जातात. त्यासाठी विविध खेळ आणि इतर उपक्रमांचाही उपयोग केला जातो. मेमरी लॅबचे काम महिन्यातून दोनदा दीनानाथ रुग्णालयात येथे चालते.

या आजाराचे स्वरूप आणि रुग्णांच्या समस्या वेगवेगळ्या असल्यामुळे त्यांच्या काळजीवाहकावर (केअर गिव्हर) अतिरिक्त ताण येऊ शकतो. यासाठी मेमरी क्लिनिक मार्फत हा ‘अल्झायमर्स सपोर्ट ग्रुप’ स्थापन करण्यात आला आहे. यात रुग्णाची काळजी कशी घ्यावी, काळजीवाहकाने स्वत:ची काळजी कशी घ्यावी. हे या स्वमदत गटामुळे समजते. येथे फिजिओथेरपिस्ट, मानसोपचार तज्ज्ञ, आहार तज्ज्ञ अशा तज्ज्ञ व्यक्तींची व्याख्याने आयोजित केली जातात. एकमेकांच्या अनुभवांची देवाणघेवाण झाल्यामुळे अनेक गोष्टी समजतात. स्वमदत गटाची बैठक दर महिन्याच्या दुसऱ्या रविवारी दुपारी ४ ते ६ या वेळात तेजसनगर विरंगुळा केंद्र येथे असते.

हा आजार आपल्याला होऊ नये यासाठी शारीरिक आरोग्य चांगले हवे. तसेच विविध उपक्रमांमध्ये सतत व्यग्र राहणे, आपले छंद, आवडी-निवडी जपणे, लोकांमध्ये मिसळणे, वाचन करणे, नवीन भाषा शिकणे, वाद्य शिकणे, मेंदूला चालना देणाऱ्या गोष्टी करणे वगैरे  केल्यास आपण या आजारापासून लांब राहू शकतो. त्यासाठी पटवर्धन बाग येथील मुखर्जी उद्यानात विरंगुळा केंद्रात सर्वासाठी ‘मेमरी क्लब’ चालवला जातो. हा उपक्रम दर मंगळवारी संध्याकाळी साडेपाच ते सात या वेळेत असतो. अशा प्रकारचा क्लब ठिकठिकाणी सुरू व्हावा आणि गरजवंतांना त्याचा फायदा मिळावा, अशी जोगळेकर यांची अपेक्षा आहे, कारण ती काळाची गरजही असल्याचे त्या म्हणतात.