टिळक रस्त्यावरील पूरम चौकामध्ये अभिनव कला महाविद्यालयाजवळ पीएमपीएल बसचा अचानक ब्रेक फेल झाल्याची घटना शनिवारी दुपारी घडली. मात्र, चालकाने वेळीच प्रसंगावधान राखत बसवर बस आदळून थांबविल्यामुळे मोठा अनर्थ टळला. या अपघातामध्ये सुदैवाने कोणालाही इजा झालेली नसून एक दुचाकीचे नुकसान झाले.
पीएमपीएलच्या कार्यालयीन कामासाठी ही बस वापरली जात होती. शनिवारी सकाळी लष्कर शाखेतील बँकेत रोकड जमा करून बस स्वारगेट डेपो येथून टिळक रस्त्याने येत होती. दुपारी बाराच्या सुमारास गजबजलेल्या अभिनव महाविद्यालयाजवळील चौकात बसचा ब्रेक फेल झाला. चालक अच्युत डोके यांनी प्रसंगावधान राखत समोरच्या बसवर ही बस आदळवली. त्यानंतर बस अभिनव कॉलेजच्या पदपथावर घातली. त्या वेळी तेथे असलेली एक दुचाकी पीएपीएलच्या चाकाखाली आली. बस पदपथावर असलेल्या विजेच्या खांबाला जाऊन आदळली.
बस चालक अच्युत डोके यांनी सांगितले, की बसचे ब्रेक निकामी झाल्याचे लक्षात आल्यानंतर मी घाबरून गेलो होतो. गर्दी असलेल्या चौकात बस घेऊन जाणे धोकादायक असल्यामुळे त्यामुळे मी समोरच्या बसला मागील बाजूने धडक दिली. त्या वेळी दुचाकीचालक समोर आला. त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात बस पदपथावर जाऊन आदळली.