पुणे : अमली पदार्थ तस्कर ललित पाटील ससून रुग्णालयातून पसार झाल्याप्रकरणी गुन्हे शाखेने दोन हजार ६०० पानांचे पुरवणी आरोपपत्र न्यायालयात सादर केले. ललित ससूनमधून पसार होण्यास सचिन वाघने मदत केल्याचा उल्लेख आरोपपत्रात करण्यात आला असून, ४५ साक्षीदारांची यादी जोडण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. सी. बिराजदार यांच्या न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणात आतापर्यंत चार हजार ८०० पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. ललितच्या मैत्रिणी अर्चना किरण निकम (वय ३३), ॲड. प्रज्ञा अरुण कांबळे ऊर्फ प्रज्ञा रोहित माहिरे (वय ३९), ललितचा भाऊ भूषण (वय ३४ ) साथीदार अभिषेक बलकवडे (वय ३१, सर्व रा. नाशिक), रोझरी एज्युकेशन ग्रुपचा भागीदार विनय अरहाना (वय ५०, रा. लष्कर), त्याचा मोटारचालक दत्तात्रेय डोके (वय ४० रा. हडपसर) अशी आरोपपत्र दाखल करण्यात आलेल्या आरोपींचे नावे आहेत.

कोठडीतून पसार होणे, कायदेशीर अटक होण्यास विरोध करणे, गुन्हेगारी कट रचणे, पुरावा नष्ट करणे अशा कलमांन्वये आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. चाकणमध्ये मेफेड्रोन बाळगल्याप्रकरणी ललितला ऑक्टोबर २०२० मध्ये अटक करण्यात आली होती. मूत्राशयाच्या विकार झाल्याचे सांगून तो ससून रूग्णालयात उपचार घेत होता. ससूनमधून त्याने मेफेड्रोनची विक्री करण्यास सुरुवात केली होती. गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने ससूनच्या प्रवेशद्वाराबाहेर सापळा लावून दोन कोटी रुपयांचे मेफेड्रोन जप्त केले होते.

हेही वाचा : गुंड शरद मोहोळ खून प्रकरणातील ‘या’ मुख्य सूत्रधाराने केला अटकपूर्व जामीनासाठी न्यायालयात अर्ज

अमली पदार्थ विक्री प्रकरणाचा सूत्रधार ललित असल्याचे तपासात उघडकीस आले होते. त्यानंतर ससूनमध्ये उपचार घेणारा ललित २ ऑक्टोबर २०२३ रोजी पसार झाला. पसार झालेल्या ललितला मुंबई पोलिसांनी १७ ऑक्टोबर रोजी अटक केली होती. या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी साथीदार सचिन वाघला अटक केली होती. वाघने ललितला ससूनमधून पसार झाल्यानंतर मदत केली होती. आरोपपत्रात ४५ जणांचे जबाब, तसेच साक्ष नोंदविण्यात आली आहे. पोलीस आयुक्त रितेश कुमार, अतिरिक्त आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे, सहायक आयुक्त सतीश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार बिडवई आणि पथकाने तपास करुन ललितसह साथीदारांविरुद्ध पुरवणी आरोपपत्र दाखल केले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chargesheet against drug trafficker lalit patil sassoon pune print news rbk 25 pbs