केदारनाथ येथील प्रलयामध्ये अडकलेल्या पुणेकरांच्या सुटकेसाठी लष्करातर्फे या परिसरात पुन्हा ‘कोम्बिंग ऑपरेशन’ करण्यात येणार आहे. हा परिसर लष्कराने पिंजून काढावा आणि हरवलेल्या पुणेकरांचा शोध घ्यावा यासाठी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी लष्करप्रमुखांशी चर्चा केली आहे.
केदारनाथ येथे गेलेल्या भाविकांमध्ये पुण्यातील शिवगौरी ट्रॅव्हल्समार्फत ७० जणांचा समावेश आहे. या प्रलयानंतर त्यातील काही पुण्याला परतले असून अद्यापही २६ जणांचा ठावठिकाणा लागत नाही. या अडकलेल्या नागरिकांच्या नातेवाइकांनी सोमवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी भेट घेतली. त्याचप्रमाणे खासदार सुप्रिया सुळे यांच्याशी चर्चा केली. त्या वेळी अजित पवार यांचे स्वीय सहायक काटकर यांना शरद पवार यांचा दूरध्वनी आला. ‘रामबरा ते गौरीकुंड हा परिसर पुन्हा एकदा पिंजून काढा आणि हरवलेल्या व्यक्तींचा शोध घ्यावा याविषयी मी लष्करप्रमुख आणि उत्तराखंड राज्याचे मुख्य सचिव यांच्याशी बोललो आहे,’ असे शरद पवार यांनी सांगितल्याचे काटकर यांनी या नातेवाइकांना सांगितले.
नातलगांचा ठावठिकाणा लागत नसल्यामुळे आम्ही हवालदिल झालो आहोत, असे सांगताच ‘माझे आई-वडील असते तर माझीही अशीच अवस्था झाली असती,’ असे सुप्रिया सुळे यांनी त्यांना सांगितले. लष्कराच्या वतीने बचावकार्य सुरू असून लवकरच सर्वाचा ठावठिकाणा लागेल. सर्व जण सुखरूप असतील अशी आपण आशा करू. राज्याचे पुनर्वसन राज्यमंत्री सुरेश धस हे तेथे पोहोचले असून ते सर्व कामावर लक्ष ठेवत आहेत, असेही त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांकडून सहकार्य मिळत नसल्याची तक्रार नातेवाइकांनी केली. आमच्याकडूनच घेतलेली माहिती पुन्हा आम्हाला दिली जात आहे याकडेही सुप्रिया सुळे यांचे लक्ष वेधण्यात आले. रामबरा येथे असलेले आमचे नातलग अजून गौरीकुंडपर्यंत पोहोचलेले नाहीत. त्यामुळे लष्कराचे जवान ७ किलोमीटपर्यंत गेले असते तरी या लोकांचा शोध लागला असता, असे त्यांनी सांगितले. यासंदर्भात पवारसाहबांशी बोलेन असे सुप्रिया सुळे सांगत असतानाच अजित पवार यांचे स्वीय सहायक काटकर यांच्या मोबाइलवर शरद पवार यांनी संपर्क साधला.
‘दादां’च्या मदतीला धावल्या ‘ताई’
उत्तराखंड येथे अडकलेल्या पुणेकरांची लवकर सुटका व्हावी असे गाऱ्हाणे मांडण्यासाठी नातेवाइकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेण्याचे ठरविले आणि त्यानुसार ते पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्य कार्यालयात आले. ‘तुम्ही अध्यक्षांच्या दालनात बसा. जिल्हा नियोजन समितीची बैठक संपवून मी तुमच्याशी बोलेन,’ असे आश्वासन अजित पवार यांनी दिल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, बैठका संपल्यावर पूर्वनियोजित कार्यक्रमासाठी अजितदादा निघून गेले. त्यामुळे नातेवाइकांनी इलेक्ट्रॉनिक माध्यमांशी बोलताना संतप्त प्रतिक्रिया दिल्या. त्यानंतर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दत्ता भरणे यांनी ‘तुम्हाला चार वाजता साखर संकुल येथे बोलावले आहे,’ असा निरोप दिला. साखर संकुल येथे अजित पवार यांनी या नातेवाइकांशी चर्चा केली आणि ते पुढील बैठकांसाठी शेजारच्या दालनात गेले. त्याचवेळी तेथे खासदार सुप्रिया सुळे आल्या आणि त्यांनी ‘दादां’च्या मदतीला धावून येत या नातलगांच्या शंकांचे समाधान केले.