पुणे : ससून सर्वोपचार रुग्णालयाच्या न्यायवैद्यकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. अजय तावरे यांना पोलिसांनी अटक केली आहे. कल्याणीनगर अपघातातील अल्पवयीन आरोपीचा रक्ताचा नमुना बदलल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. या निमित्ताने डॉ. तावरे हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. विशेष म्हणजे, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील टिंगरे यांच्या शिफारसपत्रानुसार वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी डॉ. तावरेंची नियुक्ती केली होती.

ससून रुग्णालयात मागील काही काळात डॉ. तावरे हे सर्वाधिक काळ वैद्यकीय अधीक्षकपदी राहिलेले आहेत. डॉ. तावरे हे २०२२ मध्ये अधीक्षकपदी होते. त्यावेळी रुबी हॉल रुग्णालयातील मूत्रपिंड प्रत्यारोपण रॅकेट उघड झाले होते. त्या प्रकरणात डॉ. तावरे यांच्याकडे आठ वर्षांपासून असलेले अधीक्षकपद काढून घेण्यात आले. त्यांची चौकशीही वैद्यकीय शिक्षण संचालनालयाने सुरू केली. मात्र, या चौकशीचे पुढे काहीच झाले नाही. चौकशी पूर्ण झाली की नाही, याबाबत लोकसत्ताच्या प्रतिनिधीने विचारणा केली असता खुद्द डॉ. तावरे यांनीच चौकशीचे पुढे काय झाले याची माहिती नसल्याचे सांगितले होते.

आणखी वाचा-‘पोर्श’मध्ये तांत्रिक बिघाड नव्हता! आरटीओचा प्राथमिक अहवाल; कंपनीच्या तंत्रज्ञांकडूनही मोटारीची तपासणी

गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात पुन्हा अधीक्षकपदी डॉ. तावरे यांची नियुक्ती करण्यात आली. ही नियुक्ती राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील टिंगरे यांच्या शिफारशीनुसार वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी केल्याची बाब समोर आली. डॉ. तावरे यांची ससूनच्या वैद्यकीय अधीक्षकपदी नियुक्ती करावी, असे शिफारसपत्र आमदार टिंगरे यांनी मुश्रीफांना गेल्या वर्षी २६ डिसेंबरला पाठविले होते. त्या पत्रात म्हटले होते की, डॉ. अजय तावरे हे माझ्या परिचयाचे आहेत. ते प्राध्यापक व न्यायवैद्यकशास्त्र विभागाचे प्रमुख आहेत. त्यांनी करोना संकटाच्या काळात उत्तम कर्तव्य पार पाडले होते. तरी त्यांची ससूनच्या वैद्यकीय अधीक्षकपदी नियुक्ती करण्याबाबत आपल्या स्तरावर उचित कार्यवाही करावी.

यावर मंत्री मुश्रीफ यांनी शेरा मारून ते पत्र ससूनचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळे यांना पाठविले होते. नियमानुसार वैद्यकीय अधीक्षक हा प्राध्यापक असण्याची आवश्यकता आहे, असे समजते. सध्या ज्यांच्याकडे कार्यभार आहे ते निकष पूर्ण करीत नाहीत. त्यामुळे विनंतीप्रमाणे कार्यभार देण्यात यावा, असा शेरा मुश्रीफांनी मारला होता. त्यानंतर डॉ. तावरे यांची तीनच दिवसांत २९ डिसेंबर २०२३ रोजी वैद्यकीय अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली.

आणखी वाचा-राज्यात जूनपासून कोसळधारा, जून ते सप्टेंबरमध्ये सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज

एकाच वेळी दोन महत्त्वाची पदे

ससून रुग्णालयातील अधीक्षकपद आणि न्यायवैद्यकशास्त्र विभागाचे प्रमुख अशी दोन महत्त्वाची पदे डॉ. तावरे यांच्याकडे एकाच वेळी होती. विशेष म्हणजे, एकाच व्यक्तीकडे दोन पदे नियमानुसार सोपविता येत नाहीत. असे असतानाही डॉ. तावरे यांच्यावर मेहेरनजर दाखवत त्यांना झुकते माप देण्यात आले. सुरुवातीला त्यांना न्यायवैद्यकशास्त्र विभागाचे प्रमुखपद देण्यात आले आणि त्यानंतर काही दिवसांत त्यांना अधीक्षकपद देण्यात आले. त्यांना एकाच वेळी दोन महत्त्वाची पदे देण्यास अनेक जणांनी आक्षेप नोंदवूनही त्याची दखल घेण्यात आली नव्हती.