पुणे : वीजग्राहकांच्या सेवेसाठी कर्तव्य बजावणारे महावितरणचे अभियंते, अधिकारी आणि कर्मचारी सध्या कंपनीवरील आर्थिक संकटामुळे थकीत वीजदेयकांची वसुली मोहीम राबवित आहेत. यात थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात येत आहे. या सरकारी कामात कर्मचाऱ्यांना शिवीगाळ, मारहाण, धक्काबुक्कीचे प्रकार झाल्यास त्याची गंभीर दखल घेऊन संबंधितांविरुद्ध थेट फौजदारी कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. वारंवार आवाहन करूनही वीजदेयकांचा वेळेत भरणा न करणाऱ्या थकबाकीदारांचा वीजपुरवठा नियमानुसार खंडित करण्याची कारवाई सुरू आहे.

हेही वाचा >>> आरटीई शुल्क प्रतिपूर्तीचा दर शालेय शिक्षण विभागाकडून निश्चित

महावितरणचे अभियंते, अधिकारी, कर्मचारी थकबाकीदारांकडे जाऊन वीजदेयकांची थकीत रक्कम भरण्याची विनंती केल्यानंतर शिवीगाळ, मारहाण करण्याचे प्रकार घडले आहेत. शासकीय कामात अडथळा आणणे, सरकारी कर्मचाऱ्यांना मारहाण करणे किंवा कार्यालयांची तोडफोड करणे आदी प्रकरणांमध्ये भारतीय दंड विधानाच्या विविध कलमांन्वये शिक्षेची तरतूद आहे. त्यानुसार संबंधितांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. गेल्या पाच महिन्यांत पश्चिम महाराष्ट्रात अभियंता, कर्मचाऱ्यांना मारहाण आणि धक्काबुक्की करण्याचे पुणे, सोलापूर जिल्ह्यात प्रत्येकी सहा आणि सांगलीत एक असे एकूण १३ प्रकार घडले आहेत. या प्रकरणातील १९ आरोपींविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच आरोपींच्या अटकेची देखील कारवाई पोलीस विभागाकडून करण्यात आली आहे. तसेच विविध कलमांनुसार आरोपींना दोन ते १० वर्षांपर्यंतच्या तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद आहे, असे महावितरणकडून सांगण्यात आले.