सायबरतज्ज्ञ चिरायू महाजन यांची माहिती

मायक्रोसॉफ्टच्या विंडोज एक्स पी, विस्टा, विंडोज सेव्हन आणि एट, विंडो सव्‍‌र्हर २००३ अशा तीन वर्षांपूर्वीच बंद केलेल्या संगणक प्रणाली अजूनही भारतात वापरल्या जात आहेत. देशातील सत्तर टक्के एटीएम विंडोज एक्स पी या संगणक प्रणालीवर चालू असून संगणक प्रणाली, सॉफ्टवेअर अद्ययावत न केल्यास रॅन्समवेअरसारख्या व्हायरसद्वारे भविष्यात भारतावर मोठय़ा सायबर हल्ल्याची शक्यता आहे, असा इशारा सायबरतज्ज्ञ चिरायू महाजन यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिला.

पुण्यातील एएनए सायबर फॉरेन्सिक संस्थेतर्फे आयोजित पत्रकार परिषदेत महाजन बोलत होते. रॅन्समवेअरमुळे शंभरपैकी तीन संगणकांवर परिणाम झाला आहे. पायरेटेड सॉफ्टवेअर वा बनावट दुवे वा संकेतस्थळ वा अनोळखी ईमेल उघडू नका, कारण त्यातून थेट व्हायरसचा परिणाम होऊ शकतो. जगभरातील ९९ देशांतील विविध संस्थांवर रॅन्समवेअरचा हल्ला झाला असून भारतातील तिरुपती मंदिर संस्था, आंध्र प्रदेशातील पोलिसांची संगणक यंत्रणा यांच्यावरही हल्ले झाले आहेत. रॅन्समवेअरने हल्ला केल्यानंतर बिटकॉईनद्वारे (आभासी चलन) खंडणीची रक्कम घेतली जाते. इंटरनेटवर बिटकॉईन विकत घेता येतात, त्यामुळे एका बिटकॉईन वॉलेटमधून दुसऱ्या वॉलेटमध्ये बिटकॉईन हस्तांतर केल्यास ते शोधता येत नाहीत. विशेष म्हणजे रिझव्‍‌र्ह बँकेकडून भारतात आभासी चलनावर कोणत्याही प्रकारचे नियमन नाही. त्यामुळे सामान्य नागरिकांनी अधिक काळजी घेणे आवश्यक आहे, असेही महाजन यांनी सांगितले. सायबर कायदेतज्ज्ञ अ‍ॅड. अभय नेवगी या वेळी उपस्थित होते.

सामान्य नागरिकांवर रॅन्समवेअर व्हायरसचा परिणाम अत्यंत नगण्य असून ऑनलाईन व्यवहार, खरेदी, एटीएममधून पैसे काढणे यामध्ये कोणताही धोका नाही. सेवा आणि उत्पादन करणाऱ्या संस्थांवर या हल्ल्याचा मोठा परिणाम झाला आहे. विशेषत: माहितीचे मोठय़ा प्रमाणावर आदानप्रदान करणाऱ्या संस्थांवर मोठा परिणाम झाला आहे. अनेक बँकांनी त्यांच्या यंत्रणा अद्ययावत कराव्यात, अशा सूचना रिझव्‍‌र्ह बँकेने दिल्यामुळे सध्या एटीएम बंद आहेत. त्यामुळे सरकारी संस्था, बँकांनी त्यांच्या सॉफ्टवेअर प्रणाली अद्ययावत करणे गरजेचे असून सायबर सुरक्षेचे संकेत पाळणे आणि उपाय करणे गरजेचे आहे, असे नेवगी यांनी सांगितले.

सामान्य नागरिकांनी घ्यायची काळजी

  • अनोळखी ई-मेल, संदेश, लिंक आल्यास उघडू नका.
  • अद्ययावत अ‍ॅण्टी व्हायरस वापरा.
  • कालबाह्य़ संगणक प्रणाली, पायरेटेड सॉफ्टवेअर वापरु नका.
  • संगणक प्रणाली अद्ययावत ठेवणे गरजेचे.