महापालिका भवनाजवळ असलेल्या शिवाजी पुलाला खालील बाजूने देण्यात आलेल्या सिमेंटच्या लेपचा काही भाग बुधवारी दुपारी पुलाखालून जाणाऱ्या एका मोटारीवर कोसळला. या घटनेत एकजण किरकोळ जखमी झाला असून दोन वाहनांचे नुकसान झाले.
इंग्रजांनी १९२० साली बांधलेला शिवाजी पूल ऐतिहासिक समजला जातो. त्याचे बांधकाम दगडात करण्यात आले होते. पुलाची लांबी ३७० मीटर असून रुंदी ११.४५ मीटर इतकी आहे. या पुलाच्या महापालिकेलगतच्या एका गाळ्याचे ४० ते ५० वर्षांपूर्वी आरसीसी पद्धतीने बांधकाम करण्यात आले आहे. या पुलाला खालच्या बाजूने सिमेंटचा लेप देण्यात आला होता. त्याचा काही भाग बुधवारी दुपारी कोसळण्याचा प्रकार घडला. हा भाग एका मोटारीवर पडून एकजण जखमी झाला आणि आणखी एका वाहनाचे नुकसान झाले. पुलातून पाण्याची गळती होत असल्यामुळे पुलाला खालून सिमेंटचा लेप देण्यात आला होता. सन २००५-०६ मध्ये हे काम करण्यात आले होते. त्याचा एक मोठा तुकडा बुधवारी कोसळला. ही घटना घडल्यानंतर अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी करून ज्या भागात सिमेंटचा लेप देण्यात आला होता तो उर्वरित भागही कर्मचाऱ्यांनी पाडला.
पुलाला धोका नाही
दरम्यान सिमेंटचा थर पडून पुलाचा जो भाग उघडा पडला आहे त्याची तातडीने तांत्रिक तपासणी करून दुरुस्ती करण्यात येणार आहे. पूल सद्य:स्थितीत वाहतुकीसाठी खुला असून पुलाच्या बांधकामाला कोणत्याही प्रकारचा धोका नसल्याचे महापालिकेने कळवले आहे. पुलाच्या एका गाळ्याचा काही भाग पाण्याच्या गळतीमुळे पडला असेही महापालिकेने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.