पुणे विद्यापीठ खून प्रकरणात अटक केलेल्या चार आरोपींकडे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाबाबत कसून तपास केला जात आहे. या दोन्ही गुन्ह्य़ांत आरोपींनी वापरलेले पिस्तूल एकाच प्रकारचे असल्यामुळे या आरोपींवर संशय बळावला आहे. विद्यापीठ खून प्रकरणात अटक केलेला मनीष रामविलास नागोरी ऊर्फ मन्या (वय २४, रा. इचलकरंजी, जि. कोल्हापूर) यानेच दाभोलकर यांच्या मारेकऱ्यांना शस्त्रास्त्र पुरविल्याचा पोलिसांना संशय आहे.
महर्षी विठ्ठल शिंदे पुलावर २० ऑगस्ट रोजी सकाळी सव्वासातच्या सुमारास डॉ. दाभोलकर यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. तर पुणे विद्यापीठातील रखवालदार प्रल्हाद लक्ष्मण जोगदंडकर (वय ४५, रा. विमाननगर) यांची मे २०१२ मध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी नागोरीसह राहुल सखाराम माळी (वय २१), विकाम रामअवतार खंडेलवाल (वय २२) आणि संतोष ऊर्फ सनी अनंता बागडे (वय २२, रा. तिघेही इचलकरंजी) यांना अटक केली आहे. या सर्वाना न्यायालयाने ३ डिसेंबपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या आरोपींना मुंब्रा पोलिसांनी खंडणीच्या गुन्ह्य़ात अटक केली होती. त्यच बरोबर दहशतवादविरोधी पथकानेही अटक केली होती. त्या वेळी आरोपींनी ४५ हून अधिक पिस्तूल विक्री केल्याचे आढळून आले होते. पुणे पोलिसांनी चौघांना विद्यापीठ खून प्रकरणी अटक केली आहे. नागोरीनेच डॉ. दाभोलकर यांच्या मारेकऱ्यांना पिस्तूल विक्री केल्याचा पोलिसांना संशय आहे. त्या दृष्टीने त्यांच्याकडे कसून तपास सुरू आहे. नागोरीचे अग्निशस्त्र विकण्याचे अंतरराज्यीय रॅकेट असून त्याने अनेक अग्निशस्त्र विकली आहेत.
याबाबत गुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्त डॉ. शहाजी सोळुंके यांनी सांगितले, की या चौघांना विद्यापीठ खून प्रकरणात अटक केली आहे. या गुन्ह्य़ातील आरोपींनी अनेक लोकांना अग्निशस्त्र पुरविली आहेत. नागोरी हा अग्निशस्त्र विक्री करणारा मोठा डिलर आहे. त्यामुळे त्याच्याकडून शस्त्रास्त्रासंदर्भात कसून तपास सुरू आहे.