पुणे : फसवणूक प्रकरणात हरियाणातून अटक करून पुण्यात आणताना महिला आरोपीने रेल्वेतून पलायन केल्याची घटना उघडकीस आली आहे. राजस्थानातील कोटा शहराजवळ नागदा स्थानकात सिग्नल लागल्यानंतर महिला आरोपी पोलिसांना गुंगारा देऊन पसार झाली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सादिया सिद्दीकी (वय ३५) असे पसार झालेल्या महिला आरोपीचे नाव आहे. सादियाविरुद्ध ऑनलाईन फसवणूक प्रकरणी पुणे पोलिसांच्या सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. सायबर पोलिसांनी तांत्रिक तपास करून तिचा शोध घेतला. सादीया हरियाणात रवाना झाली. तिला अटक करण्यात आली. न्यायालयाकडून प्रवासी कोठडी मिळवून सादियाला घेऊन सायबर पोलीस ठाण्याचे पथक रेल्वेतून पुण्याकडे निघाले. राजस्थानातील कोटा परिसरातील नागदा स्थानकाजवळ रेल्वे सिग्नलसाठी थांबली होती. पोलिसांना गुंगारा देऊन सादिया रेल्वेतून पसार झाली.

हेही वाचा – पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांना धमकी

हेही वाचा – पिंपरी- चिंचवडकरांना आणखी किती दिवस दिवसाआड पाणी? प्रशासनाची मोठी माहिती

दरम्यान, गुंड शरद मोहोळची पत्नी स्वाती हिला धमकी दिल्याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यात पोलिसांनी मार्शल लिलाकर याला अटक केली होती. मार्शलला पोलीस कोठडीत ठेवण्यात आले होते. त्यावेळी त्याने छातीत दुखत असल्याची बतावणी केली. मार्शलला घेऊन सायबर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचारी ससून रुग्णालयात तपासणीसाठी आले. त्यावेळी मार्शल पोलिसांना गुंगारा देऊन ससून रुग्णालयातून पसार झाला. पसार झालेल्या मार्शलला पुन्हा येरवडा भागातून अटक करण्यात आली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Female accused in cyber crime escapes from police custody pune print news rbk 25 ssb