पडदा उघडण्यापूर्वी मनावर आलेले दडपण, नेपथ्य आणि प्रकाशयोजना योग्य प्रकारे करण्याची लगबग, एकमेकांना दिलेल्या शुभेच्छा, प्रत्यक्ष अभिनय करण्यापूर्वी समूहस्वरांत लावलेला ‘ओम’ आणि जात्यावर बसल्यानंतर ओवी सुचावी त्या धर्तीवरच पडदा उघडल्यावर बालरंगकर्मीनी घडविलेला सहजसुंदर कलाविष्कार.. अशा वातावरणात राज्य बालनाटय़ स्पर्धेस मंगळवारी सुरूवात झाली.
‘पिस्तुल्या’साठी राष्ट्रीय पुरस्कार मिळविलेला बालकलाकार सूरज पवार आणि ‘रमा-माधव’ चित्रपटात छोटी रमा ही भूमिका करणारी श्रुती कार्लेकर यांच्या हस्ते राज्य बालनाटय़ स्पर्धेचे उद्घाटन झाले. भरत नाटय़ मंदिर येथे झालेल्या कार्यक्रमास नाटय़ परिषदेच्या पुणे शाखेचे अध्यक्ष सुरेश देशमुख, सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या पुणे विभागाच्या सहायक संचालिका अमिता तळेकर, परीक्षक वामन तावडे, नविनी कुलकर्णी आणि मीनाक्षी वाघ या वेळी उपस्थित होते. पुण्यासह सोलापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्य़ांचा समावेश असलेल्या पुणे विभागातील २१ नाटय़संस्था या स्पर्धेत सहभागी झाल्या आहेत. ही बालनाटय़े रसिकांना विनामूल्य पाहता येणार आहेत.
‘सर्वानी स्पर्धेत छान नाटके सादर करा’, अशा शब्दांत सूरज पवार याने शुभेच्छा दिल्या. ‘अभिजात पुणे’ संस्थेने ‘देवाघरची फुले’, ‘आगम पुणे’ संस्थेचे ‘कसे सांगू मी तुला’, ‘आकांक्षा बालरंगभूमी’ संस्थेचे ‘पिशीमावशी’, ‘आमचे आम्ही’ संस्थेचे ‘एका तळ्यात होती’, नाटय़ परिषदेच्या पुणे शाखेचे ‘जय गणेश साम्राज्य’ आणि सातारा शाखेचे ‘मला बी जत्रेला येऊ द्या की’ या बालनाटय़ांचे प्रयोग झाले. वैविध्यपूर्ण विषय हाताळणाऱ्या या बालनाटय़ांतून रंगकर्मीनी उत्तम अभिनयाचे दर्शन घडविले. त्याला रसिक प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला.