राज्यात छोटय़ा महापालिका करण्यासंबंधी शासनाने निर्णय घेतला असून हडपसर महापालिका करण्याबाबत तुम्ही निर्णय घेतल्यास त्याची अंमलबजावणी करणे पुढे शक्य होईल. त्या दृष्टीने तुम्ही पुण्यात निर्णय घ्या, अशी सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी पक्षाच्या नगरसेवकांना केली.
पुण्यातील नगरसेवक आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक शनिवारी महापौर निवासस्थानी बोलावण्यात आली होती. महापौर वैशाली बनकर, शहराध्यक्ष खासदार वंदना चव्हाण, आमदार बापू पठारे, जयदेव गायकवाड, अनिल भोसले, म्हाडाचे अध्यक्ष अंकुश काकडे, विशाल तांबे, सुभाष जगताप यांची प्रमुख उपस्थिती या वेळी होती. शहराच्या विविध प्रश्नांवर बैठकीत दोन तास चर्चा झाली. हडपसरसाठी वेगळी महापालिका करण्याबाबतही मते जाणून घेण्यात आली. शासन छोटय़ा महापालिकांसाठी अनुकूल आहे आणि तुम्ही हडपसर महापालिकेबाबत तसा निर्णय घेतलात, तर त्याबाबत शासन अंतिम निर्णय घेऊ शकेल, असे पवार यांनी या वेळी स्पष्ट केले.
पुण्यातील बीआरटी, बीआरटीसाठी करण्यात येत असलेले थांबे, रस्त्यांची कामे, पाणीपुरवठा, नव्याने समाविष्ट होणारी गावे यासह अनेकविध प्रश्न आणि विषयांवर बैठकीत चर्चा झाली. प्रभाग क्रमांक ४० मध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा जो पराभव झाला त्याबाबतही काही जणांनी मते व्यक्त केली.
पुलाबाबत फेरविचार करणार
शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय व परिसरात बांधल्या जाणाऱ्या तीन पुलांच्या कामांमध्ये महापालिकेला कोटय़वधी रुपये जादा मोजावे लागणार असल्याची तक्रार स्थायी समितीचे अध्यक्ष नीलेश निकम यांनी केली आहे. या तक्रारीबाबतही बैठकीत अजित पवार यांनी निकम यांच्याकडून माहिती घेतली. याबाबत आयुक्तांशी चर्चा करा आणि जादा खर्च होणार असल्याचे त्यातून स्पष्ट आले, तर फेरनिविदा काढण्याबाबत निर्णय करू, असे पवार म्हणाले. जादा खर्चाची जाहीर ओरड सुरू झाल्यामुळे या प्रकल्पातील एका पुलासाठी नव्याने निविदा मागवण्याच्या हालचाली महापालिकेतही सुरू झाल्या आहेत.