राज्यातील सध्याची दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन महापालिकेने मुंढवा येथील पंचवीस एकर जागेवर चारा लागवड करावी व तो चारा गोधनाला उपलब्ध करून द्यावा, असा निर्णय स्थायी समितीच्या बैठकीत मंगळवारी एकमताने घेण्यात आला.
स्थायी समितीच्या अध्यक्ष अश्विनी कदम यांनी ही माहिती पत्रकार परिषदेत दिली. राज्यात मोठा दुष्काळ असून अनेक जिल्ह्य़ांमधील शेतकऱ्यांपुढे गोधनासाठी चारा कसा उपलब्ध करून द्यायचा असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्याचा परिणाम ग्रामीण अर्थव्यवस्थेवरही झाला आहे. शासनाकडून काही प्रमाणात मदत दिली जात असली तसेच शासकीय यंत्रणा उभी केली जात असली तरी अशा परिस्थितीत शहरांनी पुढाकार घेऊन काही निर्णय घेण्याची गरज निर्माण झाली आहे. हा विचार करून चारा लागवडीचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.
मुंढवा येथील उपलब्ध पंचवीस एकर जागेवर गोधन दत्तक योजना सुरू करावी तसेच महापालिकेने चारा लागवड करावी असा निर्णय घेण्यात आला असून पुणेकरांनाही साहाय्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नागरिकांनी आपापल्या इच्छेप्रमाणे व शक्य होईल त्या प्रमाणे गोधन दत्तक घ्यावे व त्याच्या संगोपनासाठी येणाऱ्या खर्चातील वाटा उचलावा असे आवाहन करण्यात येणार आहे. महापालिका त्यासाठी बँकेत स्वतंत्र खाते उघडणार आहे. या खात्यात जमा होणारी रक्कम गोधन दत्तक योजनेवर खर्च केली जाईल. तसेच काही रक्कम जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केली जाईल. मुंढवा परिसरात महापालिका जेथे चारा लागवड करणार आहे त्या परिसरात चारा लागवडीसाठी जमीन उपलब्ध करून देण्याचेही आवाहन जमीनमालकांना करण्यात आले आहे, असेही अध्यक्ष अश्विनी कदम यांनी सांगितले.