सरकारने एफटीआयआयच्या अध्यक्षपदावरून गजेंद्र चौहान यांना इतरत्र हलविण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे केंद्र सरकार आणि फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूट’च्या (एफटीआयआय) विद्यार्थ्यांमध्ये संचालकपदाच्या नियुक्तीवरून निर्माण झालेला तिढा सुटण्याची चिन्हे दिसत आहेत. ‘हिंदुस्थान टाईम्स’ने यासंदर्भातील वृत्त प्रकाशित केले असून सरकारच्या या मवाळ भूमिकेमुळे ‘एफटीआयआय’च्या वादावर लवकरच तोडगा निघू शकतो. ‘एफटीआयआय’च्या संचालकपदी अनेक ज्येष्ठांना डावलून गजेंद्र चौहान यांची नियुक्ती करण्यात आल्याच्या विरोधात संस्थेतील विद्यार्थ्यांनी गेले ८६ दिवस संप पुकारला आहे. या संपाला चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवरांनीही पाठिंबा दर्शविला होता. मात्र, त्यानंतर या प्रकरणाने राजकीय वळण घेतल्याने सरकारसाठी हा प्रश्न प्रतिष्ठेचा बनला होता.
दरम्यान, एफटीआयआयमधील विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळासमोर सरकारने काही पर्याय ठेवले आहेत. यामध्ये चित्रपट निर्माता राजू हिराणी हे गजेंद्र चौहान यांची जागा घेणार असून, आगामी काळात गजेंद्र चौहान हे संस्थेच्या पायाभूत सुविधा आणि धोरणे ठरविणाऱ्या समितीचे अध्यक्ष राहतील असे सरकारकडून सांगण्यात आले आहे. दिग्दर्शक राजू हिराणींना विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमासंदर्भात निर्णय घेण्याचा अधिकार देणार असल्याचे समजते.