प्रिया भिडे (सदस्य, महाराष्ट्र वृक्ष संवर्धिनी)

परसबागेत झाडांची निवड प्रत्येक जण आपल्या आवडीनुसार करत असतो. त्यामुळे ‘व्यक्ती तितक्या प्रकृती’प्रमाणे प्रत्येक बाग वेगळी असते. काहींना विविध जातींच्या वनस्पतींचा संग्रह आवडतो, काहींना वैशिष्टय़पूर्ण झाडे आवडतात, काहींना हटके वनस्पती जमवायला आवडतात. नाशिकच्या जयश्रीताई पटवर्धन यांना विविध प्रकारची फुलझाडे लावायला आवडतात. एकाच प्रकारच्या फुलझाडांचे असतील त्या सर्व रंगांचे प्रकार मिळवून लावणे हा त्यांचा छंद. मातीच्या कुंडीत रंगांची उधळण करणाऱ्या पंधराहून अधिक रंगांच्या जास्वंदी आपले स्वागत करतात, तजेलदार पानांचा पांढऱ्या, लिंबोणी, राणी रंगाच्या फुलांचा चाफा लक्ष वेधून घेतो. पांढरा व गर्द लाल एकझोरा, नाजूक गुच्छांचा पेंटास, बहुरंगी बाल्सम, पांढरी, जांभळी, पिवळी व गुलाबी कोरांटी, पिवळा, केशरी, गुलाबी टेकोमा, लाल, पिवळा, गुलाबी, शंकासुर या फुलवेडीने जमवले आहेत. गुलाबी टेकोमाची कमान फारच सुंदर दिसत होती. पदार्पणातच लक्ष वेधून घेणारी काही मंडळी असतात, तसा डेलिया फुलला की दुसरीकडे बघायलाच नको. याचे भन्नाट रंग जयश्रीताईंकडे आहेत. बंगल्याच्या भोवती रानजाई, संक्रांतवेल, बोगनवेल, लसण्या, अलमांडा, जाई, जुई, सायली, कमिनिया, रक्तकमळ, पॅशनफ्रूट, रंगूनवेल, रातराणी या फुलवेलींनी चांगलेच बस्तान बसवले आहे. आपल्या जांभळय़ा फुलांचे वैभव दाखवण्यासाठी लसण्या आक्रमकपणे वाढला होता. ‘प्रत्येक जण ऋतुमानाप्रमाणे बहरतो अन् या फुलवेलींच्या रंगगंधात ‘गोदावरी’ बंगला न्हाऊन निघतो’ असे जयश्रीताईंनी सांगितले.

Famous Odissi Dancer Jhelum Paranjape article on International Dance Day
नृत्याविष्कार!
Kolhapur, Kolhapur lok sabha,
उद्योजक ते कलाकार… कोल्हापुरात सारेच प्रचारात
series of tremors Navi Mumbai
शहरात हादऱ्यांची मालिका सुरूच, नवी मुंबई महापालिका आयुक्तांच्या बदलीनंतर नगररचना विभागही सुस्त
feast of snowballs juicy fruits and green fodder for animals at Karunashram Orphanage in Wardha
वन्यप्राणी करताहेत उन्हाळा एन्जॉय! बर्फ के गोले, रसभरीत फळे अन हिरवा चारा यांची मेजवानी

बंगल्याच्या आजूबाजूला उंच इमारती झाल्या आहेत. मागे मोठय़ा वटवृक्षाची सावली आहे. तेथे जमिनीत व मातीच्या छोटय़ा कुंडय़ांमध्ये कोलियस, ऑक्झालिस स्पायडर प्लँट, मार्बल मनीप्लँट अशी पर्णशोभा बघायला मिळते.

मुख्य दरवाजापाशी पंचवीस वर्षांहून अधिक वयाचा देखणा कॅक्ट्स आहे. विविध आकारांचे अनेक देखणे कॅक्ट्स हे या बागेचे आणखी एक वैशिष्टय़. कॅक्ट्सची पिल्ले जयश्रीताई भेट म्हणून देतात.

नाशिकला पूर्वीपासून गुलाबशेती होते, कारण अनुकूल थंड हवामान. या राजाला बागेत स्थान नसते तरच नवल! गच्चीत पायऱ्यांच्या फॅब्रिकेटेड स्टँडवर अनेक गुलाबांची तजवीज केली आहे. लांब दांडय़ाच्या अधिक काळ टिकणाऱ्या फुलांपैकी विविध रंगांचे ग्लॅडिओलस, लाल, भगवी, पांढरी लीली आणि डबल निशिगंध बागेत आपले स्थान राखून होते. तिथेच शेरासारखी दिसणारी एक वनस्पती दिसली. ‘ही सोमवल्ली. एप्रिल-मेमध्ये याला पांढरी सुवासिक फुले येतात. नाशिकचे वनस्पतितज्ज्ञ शा. प्र. दीक्षित यांच्या मते ही वनस्पती पूर्वी सोमरसात वापरत असल्याचे उल्लेख आहेत.’ असे जयश्रीताईंनी सांगितले. बंगल्याच्या मागे कॉफी व लवंगेचा वृक्ष आहे. कॉफीला फळे येतात, पण लवंगेला लवंगा आलेल्या नाहीत, पण वृक्ष देखणा दिसतो.

गच्चीत ड्रममध्ये पपई, शेवगा आहे, तर जमिनीत डािळब, सीताफळ, रामफळ आहे. सध्या सीताफळ बहरात आहे. एकेक सीताफळाचे वजन आहे ५०० ग्रॅम. शिवाय भोकर, स्टारफ्रूटही आहे. कांचन, बकुळ हे अस्सल देशी वृक्ष आहेत. आदर्श परसबागेची पूर्तता भाजीपाल्याशिवाय होत नाही हे जाणून जयश्रीताईंनी दुधी, चवळी, दोडका, वांगी, मिरची, पालेभाज्या यासाठी जागा ठेवली आहे. या वर्षी हळद

व आंबे हळदीचे खूप पीक आल्याचे त्यांनी सांगितले. नुकताच  काढलेला सुरणाचा भलामोठा कंद दाखवला अन् त्या जोडीने वेलाला लटकलेले खास रानातले करांदे पण दाखवले. मी कधीच न पाहिलेला गुलाबी फुलांचा हादगा फुलला होता. त्याच्या शेंगा मला देण्याचे जयश्रीताईंनी कबूल केल९ आहे. परसबागप्रेमींची झाडांची देवाणघेवाण मोठी लाभदायक असते!

वृक्ष, लता, फुलझाडे, औषधी वनस्पती, पर्णशोभेची झाडे, फळझाडे अशा विविधतेने नटलेली ही परसबाग आदर्श बागेच्या कसोटय़ा पूर्ण करते. त्यांच्या बागेत मुंग्यांचा त्रास आहे, पण कोणतेही रसायन वापरण्याचा मोह त्या टाळतात. बागेतील पालापाचोळा, शेणपाणी व स्वयंपाकघरातील कचरा यावरच झाडाचे पोषण होते.

जयश्रीताईंच्या घरात तीन पिढय़ांचे सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात योगदान आहे. आपला छंद जोपासत त्या हा वारसा पुढे नेत आहेत. रत्नाकर पटवर्धन जिऑलॉजिस्ट, होमिओपॅथीतज्ज्ञ व वनस्पती अभ्यासक असल्याने छंदास घरात पोषक वातावरण आहे. विविध संस्था, ग्रुप्सना जयश्रीताई कंपोस्ट करण्यासाठी मार्गदर्शन करत आहेत. त्यांच्या या कामासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा!