घुमान येथील प्रकाशकांच्या बहिष्कारावरून अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ आणि प्रकाशक आमने-सामने आले आहेत. प्रकाशकांचा बहिष्काराचा निर्णय एकतर्फी असून आमच्याकडून अजूनही चर्चेची दारे खुली असल्याचे महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य यांनी मंगळवारी सांगितले. तर, संमेलनाच्या संयोजकांकडून प्रकाशकांमध्ये फूट पाडण्याचे उद्योग सुरू झाल्याने एकी दाखविण्यासाठी आम्हाला बहिष्काराचा निर्णय घ्यावा लागला असल्याचे मराठी प्रकाशक परिषदेचे कार्याध्यक्ष अरुण जाखडे यांनी सांगितले.
प्रकाशकांनी संमेलनावर बहिष्कार टाकण्याचा घेतलेला निर्णय आम्हाला माध्यमांकडूनच समजला असून त्यांनी अद्याप लेखी कळविलेले नाही, याकडे लक्ष वेधून डॉ. माधवी वैद्य म्हणाल्या, घुमान येथे मराठी माणसे नसल्याने तेथे पुस्तकांची विक्री होणार नाही हे गृहीत धरूनच प्रकाशकांसाठी आम्ही जास्तीत जास्त सवलती दिल्या आहेत. पुस्तकांची ने-आण करण्यासाठी रेल्वेची एक बोगी राखून ठेवण्यात आली आहे. प्रकाशक आणि त्यांच्या प्रतिनिधींच्या रेल्वे प्रवासासाठी दीड हजार रुपये आकारण्यात आले आहेत. रेल्वे प्रवासातील नाश्ता आणि भोजनाचा त्यामध्ये अंतर्भाव आहे. घुमान येथे पाच दिवसांच्या ग्रंथविक्री स्टॉलसाठी केवळ ११०० रुपये शुल्क आकारण्यात आले असून हा दर महामंडळाच्या इतिहासामध्ये अत्यल्प आहे. साहित्य व्यवहारामध्ये साहित्यिक आणि प्रकाशक या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. सर्व साहित्य संस्था वर्षभर प्रकाशकांबरोबरच काम करतात. संमेलनाच्या उद्घाटनानंतर एक लेखक आणि प्रकाशकाचा महामंडळातर्फे सत्कार केला जातो. त्यामुळे चर्चेची दारे बंद करून बहिष्काराचा घेतलेला निर्णय एकतर्फी आहे. घुमान या स्थळाबाबत प्रकाशकांची नाराजी असली, तरी मराठी भाषेचा झेंडा परराज्यामध्ये फडकाविणे हे देखील आवश्यकच आहे. संमेलनाला दोन महिन्यांचा कालावधी आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. आम्ही चर्चेसाठी तयार आहोत.
संवाद आणि संपर्काचा अभाव, प्रकाशकांविषयी परस्परविरोधी विधाने करीत दाखविलेला अविश्वास आणि प्रकाशकांमध्ये फूट पाडण्याचा संमेलनाच्या संयोजकांनी चालविलेला उद्योग यामुळेच घुमान येथील संमेलनावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेण्याची वेळ आली असल्याचे अरुण जाखडे यांनी सांगितले. घुमान येथील स्थळाची घोषणा झाल्यापासून प्रकाशकांमध्ये नाराजीचा सूर होता. मधल्या काळात एकदा सहभोजन घेण्याखेरीज कोणताही संवाद झालेला नाही. त्याचप्रमाणे मराठी प्रकाशक परिषदेने दिलेल्या तोंडी प्रस्तावांसंदर्भात कोणताही निर्णय घेतला गेला नाही. याउलट आमच्यात फूट पाडण्याचा प्रयत्न झाल्याच्या पाश्र्वभूमीवर नाराजी ते बहिष्कार हा प्रवास घडला. साहित्य संमेलन हे साहित्य महामंडळाचे असते. त्यामुळे चर्चा महामंडळाबरोबर होऊ शकते. भारत देसडला यांनी आजतागायत चर्चा केलेली नाही. पण, एकदा संमेलन संपले की भारत देसडला यांचा कोणताही संबंध राहणार नाही हे महामंडळाने ध्यानात घ्यायला हवे, अशी अपेक्षाही जाखडे यांनी व्यक्त केली.