अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषद पुणे शाखेच्या अध्यक्षपदासाठी मी शर्यतीमध्ये नाही, असे डॉ. सतीश देसाई यांनी सोमवारी सांगितले. नवनिर्वाचित अध्यक्ष आणि कार्यकारिणीला माझे सर्वतोपरी सहकार्य असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
राजकारण आणि समाजकारणामध्ये कोठे थांबावे हे मला समजते. नाटय़ परिषदेच्या पुणे शाखेचा अध्यक्ष या नात्याने गेली पाच वर्षे मला संधी मिळाली. या कालावधीमध्ये कार्यकारिणीच्या सहकार्याने चांगले काम करता आले. आता नव्या चेहऱ्यांना कामाची संधी मिळावी अशीच माझी इच्छा आहे. त्यामुळेच अध्यक्षपदाच्या शर्यतीमध्ये मी असणार नाही. याउलट भावी अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांना कार्यकारिणीचा सदस्य म्हणून सर्वतोपरी सहकार्य करेन, असेही डॉ. सतीश देसाई यांनी सांगितले.