दागिने गहाण ठेवण्याच्या बहाण्याने काळेवाडी येथे सराफाला शस्त्राचा धाक दाखवून लुटणाऱ्या चार आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. या आरोपींपैकी तिघे रिक्षाचालक असून, बिकट आर्थिक स्थितीमुळे लुटीचा कट रचल्याची कबुली त्यांनी पोलिसांकडे दिली. पाच नोव्हेंबरला ही घटना घडली होती. सराफाच्या शेजारील व्यापारी व नागरिकांनी दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे या आरोपींचा मोठय़ा लुटीचा प्रयत्न फसला होता.
रवींद्र पांडुरंग वाघमारे (वय २९, रा. भोंडवे वस्ती, वाल्हेकरवाडी), मैनुद्दीन मेहबुब सय्यद (रा. अण्णासाहेब मगर झोपडपट्टी, चिंचवड), राजू विलास गायकवाड (रा. मोहननगर) या तिघा रिक्षाचालकांसह रशीद लालन मुल्ला (वय २६, रा. साईमंदिर, आकुर्डी) यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून दोन तोळे सोने, एक कोयता व पिस्तुलसारखे दिसणारे लायटर जप्त करण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काळेवाडी येथे दिनेश भंवरलाल सोनी (वय ३२, रा. शिवशंकर कॉलनी, थेरगाव) यांचे ‘हरिओम ज्वेलर्स’ नावाचे दुकान आहे. पाच नोव्हेंबरला संध्याकाळी दागिने गहाण ठेवण्याच्या बहाण्याने आरोपी दुकानात आले व दुकानाचे शटर लावून घेतले. खोटी पिस्तुल व तलवारीचा धाक दाखवून आरोपींनी दुकानात लुट सुरू केली. दागिने पिशवीत भरले. सोनी यांनी आरडाओरड केल्याने शेजारील व्यापारी व काही नागरिकांनी बाहेरून शटर उघडल्यानंतर आरोपींनी पळ काढला. त्यातील एकाने जाता-जाता दागिन्यांची पिशवी ओढून नेण्याचा प्रयत्न केला, मात्र सोनी यांनी पिशवी घट्ट धरून ठेवल्याने आरोपीला ती पळवता आली नाही. केवल दोन तोळे सोने त्यांनी नेले. आरोपीने जाताना सोनी यांच्या डोक्यावर तलवारीने वार केले.
आरोपींचे हे सर्व कृत्य सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्याने पोलिसांनी चित्रीकरण तपासून माहिती घेतली असता, राजू गायकवाडचा शोध लागला. त्याला ताब्यात घेऊन इतर तीन आरोपींनाही पोलिसांनी पकडले. हे चौघेही मित्र असून, घटनेच्या चार दिवसआधी दुकानाची पाहणी करून त्यांनी हा कट रचला होता. परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त डॉ. बसवराज तेली, सहायक पोलीस आयुक्त मोहन विधाते, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सैफान मुजावर, निरीक्षक व्ही. के. कुबडे, सहायक निरीक्षक सुरेश मट्टामी, उपनिरीक्षक पांडुरंग कदम, अरुण बुधकर, शाकीर जेनेडी, शिवराज कंडालीकर, दादा धस, सचिन म्हेत्रे, गणेश भिसे यांच्या पथकाने ही कारवाई केली.