पुणे : कात्रज येथील राजीव गांधी प्राणिसंग्रहालयातून नर जातीचा बिबट्या पसार झाल्याची सोमवारी दुपारी पुढे आले. विलगीकरण कक्षातील पिंजऱ्यातील बिबट्या पळाल्याची माहिती कर्मचाऱ्यांकडून देण्यात आली. मात्र बिबट्या पिंजऱ्यातून बाहेर आला होता. तो प्राणीसंग्रहालयाच्या आवारातच होता. तो कर्मचाऱ्यांना सापडला असून त्याला बेशुद्ध करून पिंजऱ्यात बंद करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कात्रज येथील प्राणिसंग्रहालय पर्यटकांचे प्रमुख आकर्षण आहे. या प्राणिसंग्रहालयात पश्चिम घाटातील जैवविविधता दर्शविणारे सस्तन प्राणी, पक्षी आणि सरपटणारे प्राणी अशा एकूण ६६ जातींचे प्राणी आहेत. प्राणिसंग्रहालयातील खंदक हे मोठे आणि नैसर्गिक आभासाचे आहेत. सध्या असलेल्या प्राण्यांमध्ये आशियाई सिंह, जंगली मांजर, लेपर्ड कट, जाएंट स्क्विरल, पिसोरी हरीण, खोकड, जंगली कुत्रे, तरस, लायन टेल मकाक या प्राण्यांचा समावेश आहे. तसेच याशिवाय वाघ, हत्ती, गवा, अस्वल, लांडगा, कोल्हा, शेकरू आदी प्राणीही येथे आहेत. काही दिवसांपूर्वी त्यामध्ये चौशिंगे, तरस आणि बिबट्या या प्राण्यांची भर पडली होती. या प्राणिसंग्रहालयात चार बिबटे असून, त्यातील तीन मादी आहेत. यातील नर जातीचा बिबट्या पिंजऱ्यातून पसार झाल्याचे सोमवारी पुढे आले. या बिबट्याला विलगीकरण कक्षातील पिंजऱ्यात ठेवले होते. त्याला हंपी येथील अटलबिहारी वाजपेयी प्राणिसंग्रहालयातून घेण्यात आले होते. दरम्यान, यासंदर्भात महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी मात्र बिबट्या पसार झाला नसल्याचे सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Leopards escape from katraj zoo pune print news apk 13 amy