स.प. महाविद्यालयाच्या मैदानावर शनिवारी होणाऱ्या नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला आहे. सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून टिळक रस्ता दुपारी चार वाजल्यापासून रात्री आठपर्यंत बंद करण्यात येणार आहे.
मोदी यांच्या सभेला मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे टिळक रस्त्यावरील वाहतूक सायंकाळी बंद राहील. त्यामुळे नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा. त्याच बरोबर टिळक रस्त्याला जोडणारे दूवार्ंकुर चौक, टिळक स्मारक मंदिर चौक, खजिना विहीर, एस. पी. कॉलेज चौकात येणाऱ्या वाहनांना चारनंतर बंदी राहील. त्यांनी कुमठेकर, शिवाजी रस्ता, लक्ष्मी रस्त्याचा वापर करावा. तसेच, शनिवारी सकाळी आठपासून ते रात्री आठपर्यंत टिळक रस्ता, जंगली महाराज, शास्त्री, फग्र्युसन रस्ता, लक्ष्मी रस्ता, शिवाजी रस्ता, बाजीराव  रस्ता आणि सिंहगड रस्त्यावर वाहने उभी करण्यास बंदी करण्यात आली आहे. या सभेसाठी येणाऱ्या नागरिकांच्या बस म्हात्रे पुलाजवळील डी.पी. रस्ता, भिडे पुलाजवळील नदी पात्र आणि ओंकारेश्वर मैदान, कर्वे रस्ता या ठिकाणी उभ्या करता येतील. चारचाकी आणि दुचाकी वाहने सारसबाग मैदान, न्यू इंग्लिश स्कूल मैदान, पेशवे उद्यान, भावे स्कूल मैदान आणि महाराष्ट्र मंडळ या ठिकाणी उभी करता येतील, अशी माहिती वाहतूक शाखेकडून देण्यात आली.
दरम्यान, मोदी यांच्या पुणे दौऱ्यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. सभेच्या मैदानाची पुणे पोलिसांबरोबरच गुजरातच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी पाहणी केली आहे.