पुणे परिमंडळातील वीजग्राहकांना एप्रिल महिन्यातील वीजबिलासोबत अतिरिक्त सुरक्षा ठेवीचे स्वतंत्र बिल देण्यात आले असून, या सुरक्षा ठेवींचा ग्राहकांनी भरणा करावा, असे आवाहन ‘महावितरण’ कडून करण्यात आले आहे. या सुरक्षा ठेवीवर कालावधीनुसार ९.५ टक्क्य़ांपर्यंत व्याज ग्राहकांना मिळते, अशी माहितीही देण्यात आली.
अतिरिक्त सुरक्षा ठेवींची बिले ग्राहकांना मिळाल्यानंतर ती भरण्याबाबत संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. मात्र, महाराष्ट्र वीज नियामक आयोगाच्या निर्देशानुसार सर्व वर्गवारीतील वीजग्राहकांनी सुरक्षा ठेव जमा करणे बंधनकारक असल्याचे स्पष्टीकरण ‘महावितरण’ कडून देण्यात आले आहे. आर्थिक वर्षांतील एका महिन्याच्या सरासरी इतके बिल सुरक्षा ठेव म्हणून जमा करावे लागते. वीजग्राहकांनी यापूर्वी मूळ सुरक्षा ठेव जमा केली असली तरी वाढलेला वीजदर व वीजवापर लक्षात घेता वीजबिलांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे मूळ सुरक्षा ठेव व गेल्या आर्थिक वर्षांतील एका महिन्याचे सरासरी वीजबिल यातील फरकाच्या रकमेचे अतिरिक्त सुरक्षा ठेवीचे बिल ग्राहकांना देण्यात आले असल्याचे ‘महावितरण’ कडून सांगण्यात आले.
वीजग्राहकांनी दिलेल्या सुरक्षा ठेवीवर कालावधीनुसार ९.५ टक्क्य़ांपर्यंत व्याज देण्याचे राज्य वीज नियामक आयोगाचे निर्देश आहेत. त्यानुसार एप्रिल ते जून या महिन्यांच्या वीजबिलांमध्ये ग्राहकांच्या सुरक्षा ठेवीवरील व्याजाची रक्कम समायोजित केली जाते, असेही ‘महावितरण’ कडून सांगण्यात आले.