पुणे : व्यवस्थापनशास्त्र पदवी (बीबीए, बीएमएस), संगणक उपयोजन पदवी (बीसीए) अभ्यासक्रम अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या (एआयसीटीई) अखत्यारित जाण्यापासून वाचवण्यासाठी शिक्षण संस्थांनी शक्कल लढवली आहे. विद्यापीठ स्तरावर या अभ्यासक्रमांचे नामाभिधान (नोमेनक्लेचर) बदलून त्या अभ्यासक्रमांचा समावेश पारंपरिक वाणिज्य, विज्ञान पदवी अभ्यासक्रमांतर्गत केला जाणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बीबीए, बीएमएस, बीसीए अभ्यासक्रमांना व्यावसायिक दर्जा देऊन एआयसीटीईने या अभ्यासक्रमांना स्वतःच्या अखत्यारित घेतले. त्यामुळे या अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया राज्य समाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत केंद्रीय पद्धतीने राबवली जाणार आहे. त्यासाठी प्रवेश परीक्षा घेतली जाणार आहे. तसेच हे अभ्यासक्रम चालवणाऱ्या संस्थांना एआयसीटीईच्या निकषांनुसार पायाभूत सुविधा निर्माण कराव्या लागणार आहेत. त्यासाठी शिक्षण संस्थांना खर्च करावा लागणार आहे. शुल्क निर्धारण समितीकडून अभ्यासक्रमांचे शुल्क निर्धारित केले जाणार आहे. त्यामुळे या अभ्यासक्रमांचे शुल्क वाढण्याची शक्यता आहे. या कारणांमुळे एआयसीईटीच्या या निर्णयाविरोधात काही शिक्षण संस्थांनी न्यायालयात धाव घेतली आहे. मात्र, तांत्रिक पातळीवर पयार्य शोधून हे अभ्यासक्रम एआयसीटीईच्या अखत्यारित जाण्यापासून वाचवण्याचाही प्रयत्न केला जात आहे. त्यासाठी विद्यापीठाच्या स्तरावर अभ्यासक्रमांचे नामाभिधान बदलून त्यांना वाणिज्य, विज्ञान पदवीच्या अंतर्गत घेण्यात येत आहे. उदाहरणार्थ, बीबीए अभ्यासक्रमाचे नाव बीकॉम बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन, बीसीए अभ्यासक्रमाचे नाव बीकॉम कॉम्प्युटर ॲप्लिकेशन, बीबीए सीए अभ्यासक्रमाचे नाव बीकॉम कॉम्प्युटर ॲप्लिकेशन, बीबीए आयबी अभ्यासक्रमाचे नाव बीकॉम आयबी करण्याचे प्रस्तावित आहे.

हेही वाचा – पुणे : नागरिकांना अडवून पैसे मागणाऱ्या तृतीयपंथीय, भिक्षेकऱ्यांविरुद्ध खंडणीचे गुन्हे दाखल करा; पोलीस आयुक्तांचा आदेश

विद्यापीठ स्तरावर अभ्यासक्रमांचे नामाभिधान बदलल्यामुळे तांत्रिक अडचणी निर्माण होऊ शकतात. बीबीए, बीसीए हे पदवी अभ्यासक्रम विद्यापीठात स्थापित झालेले आहेत, तर वाणिज्य, विज्ञान या पदवी अभ्यासक्रमांतर्गत हे अभ्यासक्रम स्थापित झालेले नाहीत. त्यामुळे काही संस्थांमध्ये एआयसीटीई संलग्नित अभ्यासक्रम, तर काही संस्थांमध्ये नामाभिधान बदलून पारंपरिक पदवीत समावेश केलेले अभ्यासक्रम समांतरपणे चालवले जाणार असल्याकडे उच्चशिक्षणातील जाणकारांनी लक्ष वेधले.

बीबीए, बीसीए अभ्यासक्रमांचे नाव बदलण्याचा ठराव विद्या परिषदेत मांडण्यात आला. त्याला विद्या परिषदेने मान्यता दिली. आता व्यवस्थापन परिषदेत त्या बाबतचा प्रस्ताव मांडला जाणार आहे. तसेच न्यायालयाच्या निर्णयानंतर पुढील निर्णय घेतला जाणार आहे.- डॉ. पराग काळकर, प्र कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

हेही वाचा – नदी, तलावातील माशांचे आयुष्य का धोक्यात आलंय? काय आहे नवं संशोधन?

एआयसीटीई संलग्नित बीबीए, बीसीए अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना सीईटी सेलची प्रवेश परीक्षा द्यावी लागेल, तर नामाभिधान बदललेले अभ्यासक्रम पारंपरिक पदवीअंतर्गत येणार असल्याने त्यासाठी प्रवेश परीक्षा द्यावी लागणार नाही. मात्र महाविद्यालयाच्या स्तरावर प्रवेश परीक्षा घेतली जाऊ शकते किंवा बारावीच्या गुणांच्या आधारे प्रवेश दिला जाऊ शकतो. त्यामुळे विद्यार्थ्यांना व्यवस्थित माहिती घेऊन अभ्यासक्रम, संस्थेची निवड करून प्रवेश प्रक्रियेत सहभागी व्हावे लागेल. – डॉ. राजेंद्र झुंजारराव, प्राचार्य, मॉडर्न महाविद्यालय

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: New idea of educational institutes regarding bba bca what will happen pune print news ccp 14 ssb
Show comments