‘डॉक्टरी व्यवसाय इतर व्यवसायांपेक्षा वेगळा असून त्याचे वेगळेपण जपणे आवश्यक आहे. व्यसनांमध्ये अडकलेल्यांसाठी जशा व्यसनमुक्ती संस्था काम करतात, तसे पैसे कमावण्याचे व्यसन लागलेल्या डॉक्टरांना त्यातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करायला हवेत,’ असे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. प्रकाश आमटे यांनी व्यक्त केले.
मनोविकास प्रकाशन व साथी संस्था यांच्यातर्फे आयोजित कार्यक्रमात डॉ. अरुण गद्रे यांनी लिहिलेल्या व संकलित केलेल्या ‘कैफियत’ या पुस्तकाचे डॉ. प्रकाश आमटे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. डॉ. मंदाकिनी आमटे, ‘जन आरोग्य अभियान’चे डॉ. अनंत फडके, एचआयव्ही तज्ज्ञ डॉ. विनय कुलकर्णी, बालरोगतज्ज्ञ डॉ. राजीव धामणकर, प्रकाशक अरविंद पाटकर या वेळी उपस्थित होते. देशातील ७७ डॉक्टरांनी या पुस्तकात वैद्यकीय व्यवसायात त्यांनी अनुभवलेल्या गैरप्रकारांविषयी लिहिले आहे.
डॉ. आमटे म्हणाले, ‘‘वैद्यकीय व्यवसायाशी निगडित उद्योगांनी डॉक्टरांना ताब्यात घेतले आहे. याला समाजही डॉक्टरांइतकाच दोषी आहे. हेमलकसा येथे वैद्यकीय सेवा देताना मला गेल्या चाळीस वर्षांत एकही ‘मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह’ भेटलेला नाही. कारण तिथे ‘मार्केट’च नाही. वैद्यकीय व्यवसाय इतर व्यवसायांपेक्षा वेगळा आहे आणि त्याला प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. मी जेव्हा वैद्यकीय महाविद्यालयातील तरुण मुलांना भेटतो आणि त्यांच्यापुढे ग्रामीण आदिवासी जीवनाचे चित्र उभे करतो, तेव्हा त्यातील अनेक जण स्वत:हून कार्यकर्ते म्हणून काम करायला पुढे होतात.असे प्रयत्न वाढवल्यास त्याचा वैद्यकीय सेवेस फायदा होऊ शकेल.’’
‘औषध उद्योग आणि वैद्यकीय शिक्षण उद्योग हे डॉक्टरांचे कर्ते-करविते झाले असून डॉक्टर या उद्योगांच्या हातातील प्यादी बनले आहेत,’ असा मुद्दा डॉ. फडके यांनी मांडला. ते म्हणाले, ‘‘रुग्णसेवेसाठी आकारल्या जाणाऱ्या दरांमध्ये पारदर्शकता हवी. रुग्णालयांमधील ‘सेमी प्रायव्हेट’ पर्यंतच्या दर्जाच्या खाटांसाठी आकारले जाणारे दर नियंत्रणात आणणे शक्य आहे. त्यावरील ‘डीलक्स’ दर्जाच्या खाटांच्या दरांवर नियंत्रण ठेवणे गरजेचे नाही.’’