अंमली पदार्थ विरोधी पथकाने पुण्यामधील हिंजवडीतील ‘आयटी हब’मध्ये ६ लाख ४० हजार किलो रुपयांचा २५ किलो गांजा जप्त केला आहे. अंमली पदार्थ विरोधी पथकाने हिंजवडी येथे गांजा विक्रीसाठी आलेल्या तरुणाला सापळा रचून अटक केली आहे. त्याच्याकडून सहा लाखांपेक्षा जास्त किंमतीचा गांजा जप्त केला आहे. गांजासह अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव योगेश्वर गजानन फाटे (वय- 23, रा. जनता वसाहत, गोखलेनगर पुणे) असे आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजीव गांधी आयटी पार्क हिंजवडी फेज दोन येथे पुण्यातील एक तरुण गांजा विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथक यांना मिळाली होती. त्यानुसार सापळा रचला अन् अंमली पदार्थ पथकाने योगेश्वर गजानन फाटे रा. गोखले नगर याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्या जवळील बॅगेत ६ लाख ४० हजार रुपयांचा २५ किलो ६०६ ग्रॅम गांजा मिळाला. सदरची कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पौळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी शाकिर जेनेडी आणि संदीप पाटील यांच्या पथकाने केली आहे.

आणखी वाचा : बारामतीत ४६ लाखांचा ३१२ किलो गांजा जप्त

गांजा विक्रीसाठी ‘आयटी हब’च का?
लॉकडाउनमुळे गांजा विक्री ठप्प झाली होती. मात्र, राज्यात अनलॉक प्रक्रिया सुरु झाल्यानंतर पुन्हा गांजा विक्रीचा सुळसुळाट सुरू झाला आहे. दरम्यान, गांजा हा स्लम भागात कमी दराने मिळतो. तर, उच्चभ्रू भागात म्हणजे आयटी हब अश्या ठिकाणी गांजाला मोठ्या प्रमानावर मागणी असून त्याला चांगला दर मिळतो. अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.