पुण्यातील पोर्श कार अपघातप्रकरणातील अल्पवयीन आरोपी मद्यधुंद अवस्थेत नव्हता हे सिद्ध करण्यासाठी ससून रुग्णालयातील फॉरेन्सिक विभागात दोन डॉक्टरांनी आरोपीच्या रक्ताच्या नमुन्यांमध्ये फेरफार केल्याचा आरोप करत पोलिसांनी रविवारी (२६ मे) ससूनमधील दोन डॉक्टरांना अटक केली. या दोन डॉक्टरांनी अल्पवयीन मुलाने मद्यप्राशान केलं नव्हतं असा अहवाल दिला होता. मात्र अपघाताच्या काही मिनिटे आधी त्या मुलाने जवळच्याच दोन पब आणि बारमध्ये जाऊन मद्यप्राशन केलं होतं. त्याचे सीसीटीव्ही व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाले होते. त्यामुळे पोलिसांनी याप्रकरणी अधिक तपास करून ससून रुग्णालयाच्या फॉरेन्सिक विभागातील दोन डॉक्टरांना अटक केली. डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हरलोर अशी या अटक केलेल्या डॉक्टरांची नावं आहेत.

डॉ. तावरे हे ससूनच्या फॉरेन्सिक विभागाचे प्रमुख आहेत. अपघातानंतर अल्पवयीन मुलाच्या वडिलांनी डॉ. तावरे यांना फोन केला होता, असा आरोप पोलिसांनी केला आहे. दरम्यान, तावरे आणि हरलोर यांना आज (२७ मे) न्यायालयासमोर हजर केलं असता न्यायालयाने त्या दोघांची ३० मेपर्यंतची पोलीस कोठडी मंजूर केली आहे. पोलीस आता या दोघांची चौकशी करणार असून याप्रकरणी अधिक पुरावे गोळा करण्याच्या कामाला लागले आहेत.

न्यायालयाने कोठडी सुनावल्यानंतर तावरे आणि हरलोर यांचे वकील सुधीर शाह आणि जितेंद्र सावंत यांनी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी शाह म्हणाले, “आमच्या आशिलांवर पोलिसांनी कलम २०१, २१३, २१४ आणि कलम ४६७ अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. मुळात त्यांच्यावर जे आरोप आहेत त्यात ही कलमं लावली जात नाहीत. यावर आम्ही न्यायालयात युक्तिवाद केला. मात्र पोलिसांनी रुग्णालयातील सीसीटीव्ही फूटेज, मोबाईलची तपासणी करण्याची परवानगी आणि रुग्णालयातील नोंदींची मागणी केली. परंतु, या प्रकरणात आरोपीची पोलीस कोठडी मागता येत नाही. तरीदेखील पोलिसांनी कोठडी मागितली आणि कलम ४६७ मुळे न्यायालयाने कोठडी मंजूर केली आहे. पोलिसांनी आमच्या आशिलांवर अल्पवयीन आरोपीच्या रक्ताच्या नमुन्यांमध्ये फेरफार केल्याचा आरोप केला आहे.”

हे ही वाचा >> “…म्हणून २००४ मध्ये राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री झाला नाही”, सुधाकरराव नाईकांचा उल्लेख करत अजितदादांनी सांगितली पवारांची भीती

वकील जितेंद्र सावंत म्हणाले, “आम्ही न्यायालयात आज अजय तावरे यांची बाजू मांडली. एका लोकप्रतिनिधीच्या सांगण्यावरून या अपघाताच्या प्रकरणातील अल्पवयीन मुलाला मदत व्हावी यासाठी आमच्या आशिलांनी त्याच्या रक्ताच्या नमुन्यांमध्ये फेरफार केल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे. काल रात्री पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आणि रात्री अटक केली असं दाखवलं. त्यानंतर पोलिसांनी आज आमच्या अशिलांना न्यायालयासमोर हजर केलं. पोलिसांनी डॉ. अजय तावरे यांची कोठडी मागण्यासाठी जी कारणं सांगितली त्यामध्ये त्यांनी हे कोणाच्या सांगण्यावरून केलं, त्यांचा या गुन्ह्यात सहभाग होता हे पोलिसांना निष्पन्न करायचं होतं. तसेच त्यांना ससून रुग्णालयाचं सीसीटीव्ही फूटेज जप्त करायचं आहे. मात्र आम्ही न्यायालयाला सांगितलं की, ही घटना घडली तेव्हा अजय तावरे सुट्टीवर होते. यामध्ये त्यांचा प्रत्यक्ष सहभाग नव्हता.”