पुण्यातील पोर्श कार अपघाताप्रकरणी पोलीस आणि प्रशासनाच्या भोंगळ कारभारावर सामान्य जनता आणि विरोधी पक्षांमध्ये नेत्यांकडून सातत्याने टीका होत आहे. दरम्यान, गृहमंत्रालयाच्या कारभारावरही अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. अशातच उपमुख्यमंत्री तथा राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन याप्रकरणी कडक कारवाई करणार असल्याचं स्पष्ट केलं. मात्र फडणवीसांनी पत्रकार परिषदेत मांडलेल्या काही मुद्यांवर विरोधकांनी आक्षेप घेतला आहे. काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर म्हणाले, “अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर पोलीस ठाण्यात त्याला पिझ्झा देण्यात आला. त्याचबरोबर अपघातानंतर ११ तासानंतरही त्याच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले नव्हते.”

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रवींद्र धंगेकर यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, “काल गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत पुणेकरांची दिशाभूल करणाऱ्या काही बाबी समोर आल्या आहेत. त्यातली पहिली बाब म्हणजे, उपघाताची घटना घडल्यानंतर पहिल्या एफआयआरमध्ये कलम ३०४ चा उल्लेख नाही. अर्थात ही येरवडा पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक आणि तपास अधिकाऱ्यांनी गुन्ह्याचे गांभीर्य कमी व्हावे यासाठी शोधलेली पळवाट आहे का? यासाठी कुठला आर्थिक व्यवहार झाला आहे का? दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे, पुणेकरांनी या प्रकरणात आवाज उठवल्यानंतर कलम ३०४ अ आणि कलम ३०४ ची नोंद करण्यात आली.”

धंगेकर म्हणाले, “राज्याच्या गृहमंत्र्यांना गुन्हा दाखल केल्याची पहिली प्रत बदलण्याबाबत महिती देण्यात आली नव्हती का? की त्यांना माहीत असूनही ते पोलीस प्रशासन आणि त्या बिल्डरला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत? आपलं पुणे शहर वाचवण्यासाठी या गोष्टींच्या मुळाशी जाणं अत्यंत गरजेचं आहे. अधिकारी – मंत्री तर निघून जातील. पण शहराला लागलेली ही किड आमच्या पुण्यातील पिढ्यनपिढ्या बरबाद करण्याचं काम करेल.”

धंगेकरांच्या टीकेला मुरलीधर मोहोळांचं उत्तर

धंगेकरांच्या या टीकेनंतर पुण्याचे माजी महापौर आणि पुणे लोकसभेचे भाजपाचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. मोहोळ यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये ते धंगेकरांना उद्देशून म्हणाले की, “लोक तुम्हाला का नाकारतात? कारण, तुमचा अभ्यास कच्चा असतो. खोटे नॅरेटिव्ह सेट करण्यासाठी तुम्ही काहीही करु शकता. आताच्या निवडणुकीतही पुणेकरांनी ते पाहिलं आणि आता या संवेदनशील प्रकरणातही तेच!”

हे ही वाचा >> Pune Accident : आरोपीच्या तोंडावर शाई फेकण्याचा प्रयत्न; आंदोलक म्हणाले, “मुलापेक्षा त्याचा बाप…”

मोहोळ म्हणाले, “कोणत्याही घटनेत पोलीस ठाणे स्तरावर एफआयआर लिहून घेतला जातो. त्यात लावलेली कलमे योग्य आहेत की नाही, हे वरिष्ठ अधिकारी तपासतात आणि मग ते प्रकरण न्यायालयात जातं. मंगळवारीही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हेच सांगितले की, या प्रकरणात कलम ३०४ हे पहिल्यापासून लावले आहे.” यासह मोहोळ यांनी एफआयआरची १९ मे रोजीची प्रत शेअरकेली आहे. मोहोळ म्हणाले, ही १९ तारखेची प्रत पाहा आणि ‘साप-साप’ म्हणून ‘भुई धोपटणे’ हे धंदे सोडून द्या. पुणेकर तुम्हाला चांगलंच ओळखून आहेत.”

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune porsche crash murlidhar mohol says police already mentioned section 304 on first fir asc
First published on: 22-05-2024 at 16:31 IST