सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात गेल्या वर्षभर चर्चेत असणाऱ्या कौशल्य विकास विभागाचे काम अखेरीस सुरू झाले आहे. विद्यापीठाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांमध्ये आता कौशल्य विकास अभ्यासक्रमांचाही समावेश करण्यात येणार असून विद्यापीठाने राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाशी करार केला आहे. त्यामुळे पदव्युत्तर स्तरावरील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आता त्यांच्या विषयातील विविध संस्था, उद्योग यांमध्ये काम करणाऱ्या अधिकाऱ्यांकडूनच शिक्षण घेण्याची संधी मिळणार आहे.
विद्यापीठांनी त्यांच्या अभ्यासक्रमामध्ये कौशल्य विकास अभ्यासक्रमांचा समावेश करावा, अशा सूचना विद्यापीठ अनुदान आयोगाने दिल्या होत्या. त्यानंतर गेले वर्षभर विद्यापीठात कौशल्य विकास विभाग सुरू करण्याची चर्चा सुरू होती. अखेरीस हा विभाग आता सुरू झाला आहे. या वर्षीपासून या विभागामार्फत पदव्युत्तर स्तरासाठी कौशल्य विकास अभ्यासक्रम सुरू करण्यात येत आहेत.
पुणे विद्यापीठ आणि राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळामध्ये कौशल्य विकास अभ्यासक्रम सुरू करण्याबाबत करार झाला आहे. या विषयाचे महामंडळाने तयार केलेले अभ्यासक्रम, शिक्षणसाहित्य हे उद्योगक्षेत्राच्या गरजेनुसार तयार करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक प्रदेशानुसार नेमकी कोणती कौशल्यं असलेल्या मनुष्यबळाची गरज आहे, याची पाहणी महामंडळाने केली आहे. त्यानुसार विषयांची निवड आणि अभ्यासक्रमांची रचना करण्यात आली आहे. पदव्युत्तर स्तरावरील नियमित अभ्यासक्रमांबरोबर पर्यायी विषय म्हणून विद्यार्थ्यांना हे अभ्यासक्रम घेता येणार आहेत. महामंडळाशी सहकार्य करार असलेल्या देशभरातील कंपन्यांचे सहकार्य या अभ्यासक्रमासाठी मिळणार आहे. माहिती तंत्रज्ञान, वाहन उद्योग, सौंदर्य आणि आरोग्य क्षेत्र, संप्रेषण क्षेत्र, विक्री क्षेत्र, बँकिंग या पैकी आवड असलेला विषय विद्यार्थ्यांना निवडता येणार आहे. विज्ञान, सामाजिक शास्त्रे या विद्याशाखांतील पदव्युत्तर अभ्यासक्रम करताना वैकल्पिक विषय म्हणून विद्यार्थी कौशल्य विकास अभ्यासक्रम निवडू शकणार आहेत.
हा अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना महामंडळ आणि विद्यापीठाचे एकत्रित प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांना स्वतंत्र शुल्क भरावे लागणार आहे. मात्र, हा अभ्यासक्रम पूर्ण करून नोकरी मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांनी हे शुल्क भरायचे आहे.

‘‘कौशल्य विकासाचा अभ्यासक्रमात समावेश होणे गरजेचे आहे. महामंडळाबरोबर अशा प्रकारे करारबद्ध होऊन हा अभ्यासक्रम सुरू करणारे हे राज्यातील एकमेव विद्यापीठ आहे.’’
– डॉ. वासुदेव गाडे, कुलगुरू सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ