काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचे भाषणात कौतुक सुरू केले, म्हणून ज्येष्ठ पत्रकार व काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार कुमार केतकर यांना भाषण थांबवावे लागले. पिंपरी-चिंचवड शहरात शनिवारी मराठी पत्रकार परिषदेच्या अधिवेशनात हा प्रकार घडला.मराठी पत्रकार परिषदेचे थेरगाव येथील दिवंगत शंकरराव गावडे सभागृहात अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. उद्घाटनानंतरच्या सत्रात खासदार केतकर हे पत्रकारांना मार्गदर्शन करत होते.
काही वर्षांपूर्वी परभणी येथे त्यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा संदर्भ देऊन झाल्यानंतर भाषणाच्या ओघात त्यांनी राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा विषय काढला. राहुल गांधी यांच्या पदयात्रेचे व त्यांच्या एकूणच कार्यपद्धतीचे केतकर कौतुक करू लागले. तेव्हा प्रेक्षकांमध्ये उपस्थित असलेल्या एका ज्येष्ठ व्यक्तीने आक्षेप घेतला व गोंधळ सुरू केला. त्यामुळे काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. केतकर यांना भाषण थांबवावे लागले. काही क्षणातच व्यासपीठावरही गर्दी झाली. आयोजकांनी त्या व्यक्तीची शांततेत समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने आयोजक व पोलिसांनी गोंधळ घालणाऱ्या व्यक्तीस बाहेर काढले. चांगल्या प्रकारे सुरू असलेल्या कार्यक्रमात ठरवून गोंधळ घालण्याचा हा प्रकार असल्याची शंका आयोजकांनी व्यक्त केली.’मला माझ्या विचारांची मांडणी करण्याचा पूर्ण अधिकार आहे’ असे केतकर यावेळी म्हणाले. केतकर यांनी पुन्हा भाषण सुरू करावे, अशी मागणी उपस्थितांकडून होऊ लागली. त्यानंतर केतकर यांनी त्यांचे भाषण पूर्ण केले.