एकेकाळी अंदमान म्हटले की ‘काळ्या पाण्याची शिक्षा’ आणि ‘कोलू’ हे शब्द त्याला जोडूनच येत असत. मात्र, सेल्यूलर जेलमधील स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या वास्तव्याने पावन झालेल्या अंदमानला विश्व साहित्य संमेलनाचे औचित्य साधून जाण्यासाठी सावरकरप्रेमींची रीघ लागली आहे.
ऑफबीट डेस्टिनेशन्स आणि पोर्ट ब्लेअर येथील महाराष्ट्र मंडळ यांच्यातर्फे ५ आणि ६ सप्टेंबर रोजी अंदमान येथे चौथे विश्व साहित्य संमेलन होत आहे. या संमेलनास जाणाऱ्यांसाठी मुंबई ते चेन्नई हा प्रवास रेल्वेने किंवा विमानाने करण्याचा पर्याय खुला आहे. मात्र, चेन्नई ते पोर्ट ब्लेअर हा प्रवास विमानानेच करावा लागणार आहे. त्यामुळे संमेलनाच्या आयोजकांनी ३३ हजार रुपयांपासून ते ५१ हजार रुपयांपर्यंतची चार वेगवेगळी ‘पॅकेज’ जाहीर केली आहेत. साहित्य संमेलनासह अंदमान स्थळदर्शन घडविण्यात येणार असल्यामुळे साहित्यप्रेमींपासून ते पर्यटकांपर्यंत साऱ्यांनाच उत्सुकता आहे. संमेलनासाठी किमान ६०० प्रतिनिधी नेण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. पुणे-मुंबईसह राज्याच्या विविध ठिकाणांहून १६२ सावरकरप्रेमींनी प्रत्यक्ष नोंदणी करून आपले आरक्षण करून घेतले आहे, अशी माहिती ऑफबीट डेस्टिनेशन्सचे नितीन शास्त्री यांनी दिली.
स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृती सुवर्णमहोत्सवी वर्षांचे औचित्य साधून हे संमेलन होत असल्यामुळे त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. या संमेलनासाठी सुरूवातीपासूनच मिळत असलेला प्रतिसाद ध्यानात घेता ६०० प्रतिनिधींचे उद्दिष्ट लवकर पूर्ण होईल. आतापर्यंत झालेल्या नोंदणीमध्ये चार-पाच जणांच्या चमूपासून ते ४० जणांच्या ग्रुप बुकिंगचाही समावेश आहे, असेही शास्त्री यांनी सांगितले.