पुणे : देशातील रस्त्यांवरून पेट्रोल आणि डिझेलवरील वाहनांना हद्दपार करण्याचा निर्धार केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी केला आहे. यासाठी इलेक्ट्रिकसह पर्यायी इंधनावरील वाहनांना सरकारकडून प्रोत्साहन दिले जात आहे. प्रत्यक्षात पुणे शहराचा विचार करता ई-वाहनांच्या संख्येत फार मोठी वाढ होताना दिसून येत नाही. गेल्या आर्थिक वर्षात नोंदणी झालेल्या वाहनांमध्ये ई-वाहनांचे प्रमाण केवळ १० टक्के आहे.

पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) दिलेल्या माहितीनुसार, आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये पुण्यात पेट्रोल व डिझेलवरील २ लाख ९५ हजार २३० नवीन वाहनांची भर पडली. त्यात सर्वाधिक १ लाख ८३ हजार ९५९ दुचाकी आहेत. आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये दुचाकींची संख्या १ लाख ७४ हजार ६४७ होती. त्यात गेल्या आर्थिक वर्षात सुमारे १० हजारांनी वाढ झाली आहे. त्याखालोखाल ७० हजार ४४७ मोटारी असून, त्यांच्या संख्येत फारशी वाढ झालेली नाही. गेल्या आर्थिक वर्षात मालवाहतूक वाहने १२ हजार ९९०, रिक्षा १३ हजार १५४, बस १ हजार ६१२, टॅक्सी ९ हजार ७४६, इतर वाहने ३ हजार ३२२ अशी संख्या आहे.

हेही वाचा – आनंदाची बातमी! भारतीयांच्या सरासरी आयुर्मानात होतेय वाढ; जाणून घ्या कारणे…

गेल्या आर्थिक वर्षात ३२ हजार ८३६ ई-वाहनांची नोंदणी झाली. त्याआधीच्या आर्थिक वर्षात ही संख्या ३० हजार ६५३ होती. गेल्या आर्थिक वर्षात एकूण वाहनांच्या नोंदणीचा विचार करता ई-वाहनांची संख्या सुमारे १० टक्के आहे. त्यातही ई-वाहनांमध्ये २९ हजार २८५ म्हणजेच सुमारे ९० टक्के दुचाकी आहेत. त्याखालोखाल २ हजार २९० मोटारी, ७३६ मालवाहतूक वाहने, रिक्षा ४९, बस १३८, टॅक्सी ३२७ आणि इतर वाहने ११ अशी संख्या आहे. आर्थिक वर्ष २०२२-२३ च्या तुलनेत गेल्या आर्थिक वर्षात ई-वाहनांमध्ये दुचाकी, मोटारी, मालहवाहतूक वाहने आणि टॅक्सी यांच्या नोंदणीत वाढ नोंदविण्यात आली. याचवेळी रिक्षा आणि बस या ई-वाहनांच्या नोंदणीत घट झाली आहे.

ई-वाहनांच्या विक्रीत घट होणार?

देशात मार्च महिन्यात ई-वाहनांमध्ये मोटारींपेक्षा दुचाकींची मागणी वाढत आहे. देशातील एकूण दुचाकी विक्रीत ई-दुचाकींचे प्रमाण मार्चमध्ये ९ टक्क्यांवर पोहोचले. केंद्र सरकारच्या फेम अनुदान योजनेचा दुसरा टप्पा ३१ मार्चला संपला आहे. तिसऱ्या टप्प्याची घोषणा नवीन सरकारच्या जुलैमधील अर्थसंकल्पात होईल. तोपर्यंत फेम अनुदान योजना बंद झाल्याने आगामी काळात ई-वाहनांच्या विक्रीत घट होण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

हेही वाचा – ‘बीई’ करूनही मिळत नाहीये नोकरी!

एप्रिल २०२३- मार्च २०२४ पुण्यातील वाहन नोंदणी

  • पेट्रोल, डिझेलवरील वाहने – २ लाख ९५ हजार २३०
  • ई-वाहने – ३२ हजार ८३६
  • एकूण वाहने – ३ लाख २८ हजार ६६

ई-वाहनांवरील करात सरकारने काही सवलती दिल्या. मात्र, बॅटरीची किंमत अधिक असल्याने या वाहनांची किंमतही अधिक आहे. ई-वाहनांची जास्त असलेली किंमत आणि बॅटरीच्या आयुर्मानाबाबत स्पष्टता नसल्याने ग्राहक अद्याप साशंक आहेत. त्यामुळे ई-वाहनांच्या संख्येत वाढ होताना दिसत नाही. – संजीव भोर, प्रभारी प्रादेशिक परिवहन अधिकारी