पिंपरी- चिंचवड शहरातील प्राचीन धनेश्वर मंदिरात महादेवाच्या पिंडीला चंदनाचा लेप लावण्यात आला आहे. चिंचवड येथे असलेलं धनेश्वर मंदिर शेकडो वर्षांपूर्वीचं असल्याचं सांगितलं जातं. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील वैशाख महिन्यात महादेवाला चंदनाचा लेप लावण्यात आला. चिंचवडमधील प्राचीन धनेश्वर मंदिरात वैशाख महिन्याचं औचित्य साधून मंदिरात रंगबेरंगी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

हेही वाचा >>> विरोधकांच्या इंजिनात कुटुंबातील व्यक्तींसाठी जागा – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

फुलांची आरास देखील करण्यात आली. मंदिर परिसर सकाळपासूनच भाविकांनी फुलून गेला आहे. धनेश्वर हे आठशे वर्षांपूर्वीचं मंदिर असल्याचं सांगितलं जातं. वैशाख महिन्यात उन्हाचा कहर असतो. नागरिकांना उन्हाचा चटका बसतो आहे.

याच उष्णतेपासून देवाला दूर ठेवण्यासाठी आणि उष्णतेपासून बचाव करण्यासाठी महादेवाच्या पिंडीवर चंदनाचा लेप लावला जातो. ज्यामुळे थंड वाटेल अशी आख्यायिका आहे. आज ही त्याच श्रद्धेने महादेवाचे भक्त पिंडिपुढे डोकं टेकवायला मंदिरात गर्दी करत आहेत. मंदिरात रुद्राभिषेक करण्यात आला असून महाप्रसाद वाटप करण्यात येतो आहे. रात्री जागरणाचा कार्यक्रम ही होणार आहे.